वणीतील बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

वागदत्त वधुच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या

0

विवेक तोटेवार, वणी: तरुणीने लग्नास नकार देऊन बदनामी करण्याची धमकी दिल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक या पदावर कार्यरत असलेल्या चेतन संजय पोटदुखे (28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. चेतन हे मुळचे वणीचे रहिवाशी होते.

चेतन हे अत्रे ले-आऊट येथील आरबीआय कॉलनी येथे राहायचे. त्यांचे वर्धा येथील पायल नावाच्या तरुणीसोबत लग्न ठरले होते. त्यांचा साक्षगंधही झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी तरुणीने लग्नास नकार दिला. पोटदुखे व तरुणीच्या नातेवाइकांची बैठक झाली. लग्न मोडले. याबाबत तरुणीला विचारणा केली असता तिने चेतनला बदनामी करून जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. त्यामुळे चेतन मानसिक तणावात होते. बुधवारी पंख्याला दोरी बांधून चेतन यांंनी राहत्याा घरी गळफास घेतला.

घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल विनोद क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.

 

चेतनने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. पायलने लग्नास नकार दिला. ती व तिची मैत्रीण ऋतूजा माझी बदनामी करेल, माझे जीवन उद्ध्वस्त करेल, अशी धमकी देत आहे,त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे चेतनने चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी त्याआधारे पायलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चेतनच्या आत्महतेने वणी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.