पद्मविभूषण ते निर्वाण: 1968 च्या प्रजासत्ताक दिनी वणीकरांवर दुःखाचे सावट
स्मरण लोकनायकांचे... 25 जानेवारीला पद्मविभूषण जाहीर आणि दुस-या दिवशी निधनाची वार्ता
पद्मविभूषण ते निर्वाण: 1968 च्या प्रजासत्ताक दिनी वणीकरांवर दुःखाचे सावट – श्रीवल्लभ के.सरमोकदम(9527353434)
देशाचा स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस संपूर्ण भारतवासी एखाद्या सणाप्रमाणेच साजरा करतात. त्याला मोठ्या शहरापासून तर अगदी खेडेगाव सुध्दा अपवाद नाही. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारद्वारे जाहीर होणारे पद्म पुरस्कार म्हणजे त्या त्या व्यक्तींच्या गोतावळ्यासाठी, शहरासाठी अत्युच्य आनंदाचा क्षण. एखाद्या व्यक्तिला मिळणारा हा पुरस्कार जणू त्या शहराचा गौरवच. तब्बल सहा दशकांपूर्वी वणीच्या वाट्यालाही हा क्षण आला खरा पण तो क्षणिकच ठरला. दि.२५ जानेवारी १९६८ रोजी वणीचे सुपूत्र असलेले लोकनायक बापूजी अणे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला अन् दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी वणीत येवून धडकली. राष्ट्रीय सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यावर अवघ्या काही तासांत वणीकरांच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले. या घटनेला आज ५८ वर्षे पूर्ण झाली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विदर्भातील अग्रणी ठरलेले सेनानी म्हणजे लोकनायक बापूजी अणे. मूलतः वणीचेच सुपूत्र असलेल्या बापूजींचा जन्म १८८० मधे वणीतच झाला. उच्चविद्याविभूषित असलेल्या बापूजींनी वणी नगराला स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आणले होते. अखेरच्या काळात त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. काही महिन्यांपासून ते आजारी होते. अशातच दि. २५ जानेवारी १९६८ रोजी भारत सरकारने लोकनायकांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा केली. त्याच दिवशी ही आनंदवार्ता वणीत पोहचली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आलेली ही वार्ता म्हणजे समस्त वणीकरांची मान उंचावणारीच होती. त्यावेळी वणीतील शासकीय मैदानावर ध्वजवंदन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरु झालेली नव्हती. त्यामूळे लो.टि.महाविद्यालयातच त्या अनुषंगाने आनंदोत्सवाचे वातावरण होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेत लोकनायक बापूजी अणेंचा सिंहाचा वाटा असल्याने या संस्थेसाठीही जाहीर झालेला पद्मविभूषण एक सुवर्णक्षणच होता. पण वणीकरांचा हा आनंद क्षणिकच ठरला. दि.२६ जानेवारीचा दिवस उजाडला खरा पण त्याच सकाळी लोकनायकांच्या निर्वाणाची बातमी आली. क्षणात आनंदी वातावरण बदलून संपूर्ण शहरावर दुःखाचे सावट पसरले. केवळ सोपस्कार म्हणून ध्वजवंदन झाले.
लो.टिळक महाविद्यालयात होणारी परेड,सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही रद्द झाले. प्राचार्य नानासाहेब शेवळकरांनी केवळ तिंरंगा फडकावून लोकनायकांप्रती संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे डोळे पाणावल्याचे आजही अनेकांना स्मरते. बापूजींच्या निर्वाणानंतर दोन तिन वर्षात शेवाळकरांच्या पुढाकाराने जटाशंकर चौकात त्यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. तर दोन वर्षांनी लो.टिळक महाविद्यालयात त्यांच्या स्मृतिदिनी व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. ती आजतागायत सुरु आहे.
लोकनायक बापूजी अणे म्हणजे वणीच्या नररत्नांमधील शिरोमणीच.लो.टिळकांचे पट्टशिष्य राहिलेले बापूजी संविधान सभेचे सदस्य होते.१९६८ मधे त्यांना पद्मविभूषण तर १९७३ साली लो.टिळकांवरील संस्कृत चरित्र ग्रंथाचा साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात आला होता.भारत सरकारद्वारे सर्वोच्च नागरी व साहित्य पुरस्कार मिळालेले ते वणीतील एकमेव आहेत.वणीचे नररत्न ठरलेल्या या महान देशभक्तास त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
Comments are closed.