वणीच्या राजकारणाचे पितामह बापूराव पाटील पानघाटे यांचे निधन
असा होता सरपंच ते आमदार राजकीय प्रवास...
विवेक तोटेवार, वणी: राजकारणातील सहकार क्षेत्रातील भीष्मपितामह बापूराव हरबाजी पानघाटे यांचे काल बुधवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. वणीच्या राजकारणात व सहकार क्षेत्रात ते ‘बापूराव पाटील’ या नावाने ओळखले जात. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार 19 एप्रिल रोजी 4 वाजता निघणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
असा सुरु झाला राजकीय प्रवास….
कोलगाव (साखरा) या त्यांच्या मूळ गावापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. कोलगावचे ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी नंतर राजकारणात कधीही मागे वळून पाहले नाही. त्यांच्या बेरजेच्या राजकारणाने त्यांच्याकडे अनेक पदे आपसूकच चालून आली.
सरपंच पदानंतर वणी पंचायत समितीच्या उपसभापती पदाची आणि त्यानंतर सभापती म्हणून त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ते वणी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष झाले. यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे पक्ष श्रेष्ठीनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या धुरीणांनी त्यांचा चढता राजकीय आलेख पाहून त्यांना 1978 मध्ये वणी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी 50 हजार 142 मते प्राप्त करून अपक्ष उमेदवार दादाजी सीताराम नांदेकर यांचा 36,645 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी बहाल केली. या निवडणुकीत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नामदेवराव नारायण काळे यांचा 16 हजार 976 मतांनी पराभव केला होता. त्यांच्या निधनाने वणीच्या राजकारण, सहकार, समाजकारणातील एक मनस्वी व द्रस्टा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा शोकसंदेशात विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा शोकसंदेश…