मद्यप्रेमींची कोंडी… ! वणीत बारचालकांचे करवाढीविरोधात आंदोलन

मद्यप्रेमींच्या खिशाला किती चोट बसणार? वाईनशॉपमधून खरेदी केल्यास सुट मिळणार का?

बहुगुणी डेस्क, वणी: विदेशी मद्य विक्री कर व एक्साईज ड्युटीमध्ये वाढ झाल्याने विदेशी मद्यांच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार व बेकायदेशीर दारूच्या विक्रीमध्ये भरमसाठ वाढ होणार असल्याने याविरोधात बार मालकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. वणीत देखील हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सोमवारी दिनांक 14 जुलै रोजी दिवसभर परमिट रूम बंद ठेवण्यात आली. या बंदमध्ये वाईन शॉपचालकही सहभागी झाले होते. त्यामुळे तळीरामांचे चांगलेच हाल झालेत. मात्र दरवाढ झाल्यास केवळ बार चालकांनाच नाही तर ग्राहकांना देखील आणखी हाल सोसावे लागणार, अशी प्रतिक्रिया बार असोसिएशनने ‘वणी बहुगुणी’जवळ बोलून दाखवली. 

वणी येथील वरोरा रोडवरील हॉटेल आशीर्वाद येथे सर्व मद्य विक्रेते परवानाधारक एकत्र  आलेत. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांची भेट घेत निषेधपत्र सादर केले. यावेळी त्यांनी करवाढीमुळे व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याचे सांगत शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. यासह त्यांनी ठाणेदार वणी यांनाही स्वतंत्र निवेदन सादर करुन विरोध दर्शवला. महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये मद्यविक्रीवरील उत्पादन शुल्कात 60%, व्हॅट 5% वरून 10%, आणि परवाना शुल्कात 15% वाढ केली आहे, ज्यामुळे बारमधील मद्याच्या किमतीत 20-40% वाढ अपेक्षित आहे. तर वाईन शॉपच्या दरात देखील 20 ते 30 टक्क्यांची दरवाढ अपेक्षीत आहे.  

मद्यप्रेमींच्या खिशाला किती चोट बसणार?
उदाहरणार्थ, बारमध्ये 300 रुपये किमतीची व्हिस्कीची बॉटल आता 360 ते 420 रुपये होऊ शकते. तर एक 60 मीलीचा पेगची किंमत जर आता 110 रुपये असेल तर ही किंमत आता 130 ते 150 रुपये इतकी होऊ शकते. वाईन शॉपमधून जर मद्याची खरेदी कराल तर त्याचे दर देखील सुमारे 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजे 200 रुपयांची व्हिस्कीची बॉटल आता 240 ते 260 रुपयांना मिळेल. बारमध्ये सर्विस चार्ज व इतर चार्ज असल्याने बारमध्ये मद्य पिणा-यांना अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बार चालकांना मोठा फटका बसू शकतो. तसेच बियरबारमध्ये पिणे महागल्याने लोक धाब्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून पिणार अशी भिती देखील बार चालकांकडून व्यक्त केली जात आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बियर पिल्यास परवडणार का?
उत्पादन शुल्कवाढीतून बियर व वाईन याला सुट देण्यात आली आहे. मात्र परवाना शुल्क व व्हॅट वाढल्याने बियर व वाईनच्या दरातही 5 ते 10 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे बारमध्ये 300 रुपयांची बिअर आता 315 ते 330 रुपयांना मिळेल. तर वाईन शॉपमध्ये 200 रुपयांची बियर मिळत असल्यास त्याच्या दरात 10 ते 20 रुपये वाढ होऊ शकते. संपूर्ण राज्यात बियर पेक्षा व्हिस्कीचे ग्राहक अधिक आहेत. वणी व परिसरात देखील व्हिस्कीचे ग्राहकच अधिक आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसू शकतो

या निषेध आंदोलनात युनियनचे सदस्य सुभाष डोरलीकर, आशिष मोहितकर, धीरज देवडे, रवी बोडेकर, विकी ठाकूरवार, मोरेश्वर उज्चलकर, अनुज मुकेवार, सुमित डोळस, संकेत गंधारे व परिसरातील शंभराहून अधिक मद्य विक्रेते परवानाधारकांनी हजेरी लावली.

Comments are closed.