विवेक तोटेवार, वणी: वणीतील कोंडावार ले आऊटमध्ये मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घरासमोर टँकर उभे करण्यावरून भावाभावामध्ये वाद झाला. या वादात एका भावाला त्याच्या दोन भावांनी व वहिणीने मारहाण केली. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी नगरसेवक आहे.
फिर्यादी नरेश दिगंबर पाते हे आपले भाऊ हरीश दिगंबर पाते व धीरज दिगंबर पाते यांच्या घरासमोर राहतात. मंगळवारी दुपारी पाण्याचे टँकर नरेशच्या घरासमोर उभे केले. नरेशच्या पत्नीने घरासमोर टँकर का उभे केले अशी विचारणा केली.
यावरून धीरज पाते हा हातात लाकडी दांडा घेऊन आला व त्याने मित्राच्या ड्राइव्हर सोबत वाद का घालत आहे अशी विचारणा केली. यावेळी नरेश हा घराबाहेर आला. तेव्हा धीरज याने लाकडी दांड्याने नरेश याला मारहाण केली. त्याच वेळी हरीश हा देखील बाहेर आला व त्याने व धीरजची पत्नी काजल हिने देखील नरेश व त्याच्या पत्नीला मारहाण केली.
यात नरेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी उपचार केल्यानंतर वणी पोलीस ठाणे गाठून भाऊ धीरज, हरीश व काजल यांच्याविरुद्ध तक्रार दिली. नरेश याच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 326, 504, 506 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास जगदीश बोरणारे करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)