बहुगुणी डेस्क, वणी: आठवडी बाजारातून कोंबडा विकत घेणा-या शेतक-यांना एका अधिका-याने मारहाण केली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व अहेरअल्लीचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अधिका-यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मंगळवारी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
परिसरात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करतात. रविवार वणीतील जत्रा मैदानावर आठवडी बाजार भरतो. या बाजारात मोठ्या प्रमाणात मद्रासी ब्रीडचे मीठा बोटम जातीचे कोंबडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. अनेक शेतकरी हे कोंबडे विकत घेऊन त्यांची योग्य ती वाढ करतात. त्यानंतर त्याची विक्री करतात. यात त्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी काही शेतकरी हे कोंबडे विकत घेण्यासाठी जत्रा मैदान येथील आठवडी बाजारात आले होते.
दरम्यान या ठिकाणी पोलीस पथक आले. पथकातील अधिका-याने कोंबडे विक्रेत्यांना कोंबडे विक्रीसाठी मज्जाव केला. तसेच कोंबडे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण केली असा आरोप करण्यात आला आहे. मारहाण झाली त्यावेळी सरपंच हितेश राऊत हे घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
कोंबडबाजार सुरु, मात्र कोंबडा विक्री नको – हितेश राऊत
मद्रासी ब्रिडचे कोंबडे विक्रीसाठी कोणताही प्रतिबंध नाही. शिवाय हे कोंबडे काही संरक्षीत पक्षी नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबड बाजार सुरु आहे. मात्र या जुगा-यांवर तसेच कोंबड बाजार भरवणा-यांवर पोलीस प्रशासन कार्यवाही करीत नाही. मात्र जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनासाठी कोंबडा विकत घेणा-या शेतक-यांना मात्र फटके दिले जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकचे चार पैसे मिळण्यासाठी जोडधंदा करु नये का?
या प्रकरणाची चौकशी करून शेतक-यांना नाहक मारहाण करणा-या अधिका-यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हितेश राऊत यांनी निवेदनातून केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे.
Comments are closed.