लिंगारेड्डी लेआऊटमधील अतिक्रमण उठवण्याचा मार्ग मोकळा

अधिका-यांनी केली अतिक्रमीत जागेची पाहणी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लिंगारेड्डी लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. अतिक्रमण केलेल्या शौचालयाचे पाणी व दुकानातील पाणी घरात शिरत असल्याने गारमेलवार कुटुंबीयांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले असून अतिक्रमण केलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण उठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गजानन दमडाजी गारमेलवार अनेक वर्षांपासून लिंगारेड्डी अंडेलवार लेआऊट मध्ये राहत आहे. प्लॉटधारकांनी दुकानाची चाळ काढून दुकाने भाड्याने दिली आहेत. सदर दुकानदाराने स्वतःच्या जागेच्या व्यतिरीक्त सरकारी जागेवर अतिक्रमण करून दुकान बांधले आहे. याशिवाय बोअर मारून कोंबडे पालन करण्याकरिता बेंदे उभारले आहे. कोंबड्याचे बेंदे धुण्याचे पाणी, बोअरचे पाणी तसेच अतिक्रमित जागेवरचे पाणी लेआऊटमधील भोयर यांच्या प्लॉटमधून गारमेलवार यांच्या घरात घुसत असल्याने गारमेलवार कटुंबिय त्रस्त झाले होते. त्यांनी याबाबत तक्रार केली होती. 

या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना याबाबत अहवाल मागवला होता. गटविकास अधिकारी सुधाकर जाधव व मुकुटबन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव यांनी लिंगारेड्डी लेआऊट मधील अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी तक्रारकर्ता गजानन गारमेलवार यांना सोबत घेत पाहणी केली.

पाहणी दरम्यान अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे. तर ग्रामपंचायतीच्या मुख्य मार्गावर अतिक्रमण करून बांधलेले शौचालयाबाबत जागेची मोजणी करून अतिक्रमण असलेला भाग पाडला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागणार आहे. 

शासनाच्या ज्या नियमाने लेआऊट मंजूर करून प्लॉट पाडण्यात आले त्या नियमांचे पालन करून इतर संपूर्ण अतिक्रमण काढून दोन्ही साईडला नाली बांधकाम करावी. वॉर्ड क्र ५ मध्ये येणाऱ्या याच लेआउटच्या मुख्य मार्गावर नवीन शौचालय बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. प्लॉटधारकांना येण्या जाण्याकरिता एकमेव रस्ता आहे. या शौचालयामुळे तेथील जनतेला येण्या-जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर अतिक्रमण करणाऱ्याने ग्रामपंचायतीच्या नालीच्यावर शौचालय बांधकाम केले आहे. याबाबत वॉर्डातील जनतेने ग्रामपंचायतीला तक्रारसुद्धा केली होती. परंतु ग्रामपंचायतने अतिक्रमण करून बांधलेले शौचालय पाडले नाही. वॉर्डातील जनतेला याच मार्गाने मोटर सायकलने व पायी जाणे येणे करावे लागते. वाहन शौचालयाला धडक लागून पडले किंवा अपघात होऊन कुणी जखमी झाल्यास याला जवाबदार कोण? असाही प्रश्न तक्रारीतून उपस्थित करण्यात आला होता.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.