अखेर ‘ते’ अतिक्रमण हटवण्यास सुरूवात

गेल्या आठवड्यापासून सुरू होते एमआयडीसी परिसरात अतिक्रमण

0

जब्बार चीनी, वणी: एमआयडीसी परिसराजवळ असलेल्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान नगरपालिका व महसूल प्रशासनाने या कार्यवाहीस सुरूवात केली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे अतिक्रमण उठवण्यात येत आहे. यावेळी ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह नगरपालिका व महसूल प्रशासनाचे कर्मचारीही उपस्थित होते. 

शहरालगत असलेल्या सर्वे क्रमांक 106 मधील एमआयडीसी परिसराच्या मागील परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी अतिक्रमण करणे सुरू केले होते. या जागेवर शेड ही उभारण्यात आले होते शिवाय अतिक्रमीत जागेवर कुंपण टाकूण ही जागा हडपण्याचा प्रयत्नही सुरू होता.

सदर जागा ही नगरपालिकेची असून ही जागा नगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट हबसाठी आरक्षीत केलेली आहे. ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून मोकळी असल्याने गेल्या आठवड्यात काही लोकांनी ही जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. यात एका शासकिय कर्मचा-यानेही हात धुतले आहे.

सोशल मीडियातून फोडली वाचा… 
वणीतील एका सुज्ञ नागरिकाने सोशल मीडियातून या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर अनेकांनी हे प्रकरण उचलून धरत याविरोधात आवाज उठवला तसेच हे अतिक्रमण उठवण्याची मागणी केली. नगरपालिका व महसूल प्रशासनाने याची दखल घेत या जागेवर अतिक्रमण करू नये असे आवाहन केले होते. अखेर आज हे अतिक्रमण उठवण्यास सुरूवात झाली आहे.

कुंपणच जेव्हा शेत खाते…
अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेत सर्वात मोठे अतिक्रमण एका शासकीय कर्मचा-याचे आहे. सदर कर्मचारी हा वनविभागात कार्यरत आहे. शासकिय जागेत अतिक्रमण करणे ही काही नवीन बाब नाही. मात्र या प्रकरणात चक्क एक शासकीय कर्मचारीच अतिक्रमण करून जागा बळकावण्यात पुढे असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार म्हणजे कुंपणच शेत खाण्याचा आहे. त्यामुळे या कर्मचा-यावर प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लिंकवर पाहा सविस्तर व्हिडीओ…

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.