बेटी बचाओ आंदोलनात वणीला मिळाला पहिला बहुमान

बेटी बचाओ आंदोलनाचे प्रणेते डॉ गणेश राख करणार सुरुवात

0

वणी (रवि ढुमणे): सध्या विविध स्तरातून बेटी बचाओ आंदोलने उभारण्यात आली होती. मात्र मनातील धग आणि जिव्हाळा जोपासून या अनमोल कार्याची स्वतःपासून सुरुवात करून “बेटी बचाओ” आंदोलनाची धुरा सांभाळणारे  बेटी बचाओ आंदोलनाचे प्रणेते डॉ गणेश राख हे पहिल्यांदाच वणीत येत आहेत.  इतकेच नव्हे तर बेटी बचाओ आंदोलनाचा विदर्भात पहिल्यांदाच वणीला बहुमान प्राप्त होत आहे. या निमित्य 24 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते 10.30  वाजताचे दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवून बेटी बचाओ आंदोलन खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे आवाहन डॉ गणेश राख व मनीष बुरडकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रात बेटी बचाओ आंदोलनाची खऱ्या अर्थाने स्वतःपासून सुरुवात करणारे डॉक्टर गणेश राख यांचे स्वतःचे प्रसूती रुग्णालय आहे. त्यांच्या रुग्णालयात प्रसूती होऊन ज्या मातेला मुलगी झाली तिला उपहार देऊन बाळांतपणाचा संपूर्ण खर्च डॉक्टर गणेश राख हे स्वतः करतात.  ज्या दाम्पत्याला मुलगी झाली त्यांना डॉ राख यांच्या रुग्णालयात खर्चच नाही.

हल्ली स्त्री रोगतज्ञ डॉक्टर बेटी बचाओ चा नारा देऊन आंदोलने उभारताना बघितले आहेत.  प्रसूती साठी महिला आली की तिला शस्त्रक्रिया करावीच लागते असे कुटुंबियांना सांगून त्यांची मानसिकता तयार करण्यात येते. व येथूनच लुटण्याचा कार्यक्रम सुरू होतो.  मागील काळात वणीत बेटी बचाओ अभियान राबविण्यात आले होते.  अनेक राजकीय,सामाजिक,वैद्यकीय ,व सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला होता.  यात प्रमुख असलेले डॉक्टर असतांना बेटी बचाओ चा नारा दिला पण बेटी बचाओ साठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत हेच खरे दुःख आहे. एकीकडे प्रसिद्धी साठी पुढे पुढे करायचे आणि दुसरीकडे लूटमार!  या व्यवसायाला बगल देत हडपसर (पुणे) येथे हमाली करणारे वडील व धुणीभांडी करणारी आई घरात मोलमजुरी शिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीत हमाली काम करून डॉक्टर झालेल्या बेटी बचाओ आंदोलनाचे प्रणेते डॉ गणेश राख यांनी हडपसर भागात स्वतःच रुग्णालय उभारलं.

या रुग्णालयात मुलगी जन्माला आली तर पेढे वाटून आंनद साजरा केला. इतकेच नव्हे तर मुलगी जन्माला आल्यानंतर सर्व खर्च माफ केलेत.  बेटी बचाओ आंदोलनाची स्वतःपासून सुरुवात करणाऱ्या डॉ गणेश राख यांनी हजारो कळ्या फुलविल्या आहेत. त्यांनी उभारलेलं हे आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आहेत. अनेक डॉक्टर सेवाभावी संस्था, आदींनी या मोहिमेत सहभागी होऊन आंदोलनाला बळकटी दिली आहे.

डॉ गणेश राख यांच्या बेटी बचाओ अभियानाची दखल फक्त देश भरातील वृत्तपत्रांनीच नव्हे तर जगातील पाकिस्तान, जर्मनी, रशिया, नायजेरिया, नेपाळ सारख्या देशांनीं देखील घेतली आहे.अमेरिकेतील प्रसिद्ध युनो या संस्थेने डॉ गणेश राख यांच्या कार्याची स्तुती देखील केली.डॉ गणेश राख हे अमिताभ बच्चन यांच्या ” आज की रात है जिंदगी ” या कार्यक्रमाचे विजेते ठरले. त्यावेळी बोलताना अमिताभ बच्चन यांनी डॉ गणेश राख हेच खरे हिरो आहे या शब्दात त्यांचे कौतुक केले.

बेटी बचाओ आंदोलनाचे प्रणेते डॉ गणेश राख विदर्भात पहिल्यांदाच येत आहे.  आणि विशेष म्हणजे विदर्भातील त्यांच्या आंदोलनाचा पहिला बहुमान वणी येथील मनीष सुधाकर बुरडकर या तरुणाच्या प्रयत्नाने वणीला मिळाला आहे.  बेटी बचाओ आंदोलन येत्या 24 फेब्रुवारीला  वणीत होणार आहे.  या निमित्ताने शाळा कॉलेज मध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असे आयोजन असणार आहे.  वणी परिसरातील कुमारी मातांची समस्या हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

त्यासाठी डॉक्टर ,वकील व्यवसायातील मंडळींनी मुलगी वाचवा हे अभियान राबवायचे असेल तर त्यांना बिलात सूट देऊन प्रथम सुरुवात करायला हवी असा डॉ राख यांचा मानस आहे.  वणीत पहिल्यांदाच होणाऱ्या बेटी बचाओ आंदोलनात सर्वच क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घेत सहभागी होण्याचे आवाहन मनीष बुरडकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमात वणी शहरातील सामाजिक , राजकीय , कला , क्रीडा , शैक्षणिक , वैद्यकीय , शासकीय , प्रशासकीय , अर्थक्षेत्रात आपली सामाजिक जबाबदारी बजावत असलेल्या महिलांचा सत्कार देखील केला जाणार असल्याची माहिती मनीष बुरडकर यांनी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.