चैत्र नवरात्रोत्सवात रंगली भक्तिसुधा
वणी: श्री जैताई देवस्थान वणी येथे चैत्र नवरात्रोत्सव आरंभ झाला. या निमित्त अरुण दिवे यांची भक्तिसंगीताची मैफल देवस्थान परिसरात झाली. निवेदक, गीतकार व मुक्तलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी निवेदक म्हणून मैफलीची धुरा सांभाळली. सहगायन लता राईरकर, भालचंद्र मोहितकर, दीपक राईरकर यांनी केले. संवादिनीची साथ अजीत खंदारे यांनी तर तबल्याची साथ अभिलाष राजूरकर यांनी केली.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ग. दि. माडगुळकर, सुधीर मोघे यंाच्या दर्जेदार रचनांनी मैफलीत बहार आली. समतेचा पाया असणा-या वारकरीधर्माचे व ऊर्जाकेंद्र विठ्ठलाचे वर्णन करणारे अभंग रसिकांच्या पसंतीस उतरलेत. जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत सांगणारं पं. प्रभाकर कारेकरांनी गायलेलं ‘‘ओघळणारी पुसून आसवे, सदा सर्वदा हसत राहावे’’ हे गाणं रसिकांना भावलं. निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांच्या निवेदनातील प्रसंग, दाखले, नेमके काव्य यामुळे मैफल अधिक बहारदार झाली.
चैत्र नवरात्रोत्सव व येणा-या रामनवमीच्या अनुषंगाने शकील बदायुनी यांचं ‘‘जय रघुनंदन जय सीयाराम’’ हे मोहंमद रफी साहेबांनी गायलेलं गाणं रसिकांच्या पसंतीस उतरलं. श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीदुर्गा, गुरुदेव दत्त यांच्यावर आधारित अनेक भक्तिगीते या मैफलीत सादर झालीत. शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम अशा अनेकप्रकारच्या भक्तिगीतांनी रसिकांची मने तृप्त झालीत. उठी श्रीरामा पहाट झाली, रामा रघुनंदना, आदी माया अंबाबाई, रुणूझुणू रे भ्रमरा, पांडुरंग कांती, जय रघुनंदन जय सीयाराम अशा अनेक दर्जेदार भक्तिगीतांनी मैफलीत रंग भरला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभारप्रदर्शन प्रा. चंद्रकांत अणे ह्यांनी केली. यावेळी श्री जैताई देवस्थान समितीचे पदाधिकारी व वणीकर रसिक जनता प्रामुख्याने उपस्थित होती.