वणीत शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाची बैठक
बंटी तामगाडगे, वणी: वणीतील भीमनगर येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये भारिपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक ठेवण्यात आली आहे. 4 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची यवतमाळ येथे सभा आहे. या सभेच्या अनुषंगाने वणीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
समाजातील वंचित घटकांना मागील ७० वर्षांत देशाच्या सभागृहात जाण्याची संधी मिळालेली नाही. राज्यातील धनगर, माळी, कोळी अशा प्रत्येक जातीच्या उमेदवारांना लोकसभेसाठी किमान दोन जागा द्याव्यात, असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच मांडला आहे. यासाठी त्यांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ची स्थापना करून या बॅनरखाली विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही केली आहे.
त्यानिमित्त राज्यभरात भारिपच्या वतीने ‘वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रा’ काढली जात आहे. यवतमाळ जिह्यात होणारी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी व त्याची पुर्व तयारी करिता वणी तालुका व शहर भारिप बहुजन महासंघातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी या बैठकीला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी भीमनगर येथील बुद्ध विहारात उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती भारिप-बमसंचे मंगल तेलंग यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.