’भार’ ती सांभाळते सकलांचा

उत्सव भक्तीचा, गौरव शक्तीचा, नऊ जणी-बहुगुणी अंतर्गत खास लेख

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः भारती सरपटवार नाव जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे नाव कुठे ना कुठे येते. थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 30-40 वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्यांचा ‘भार’ ती माउली सांभाळत आहे. काकू, मामी, मावशी, आत्या किंवा मॅडम नावापुढे लागतं. तरी यातील प्रेम आणि जिव्हाळा एकच. जैताई नवरात्रात अगदी पहाटेपासून तर रात्रीपर्यंत सगळ्यांशीच भेटणाऱ्या, बोलणाऱ्या प्रसन्नवदना भारती सरपटवार.

मातृशक्तीचा उत्सव सध्या सुरूच आहे. भारती या मायेने ओथंबलेल्या आहेत. कुणाचं आडनाव घेतलं तर फार औपचारिक वाटतं. भारती ह्या तसं शक्यतो करत नाही. त्या डायरेक्ट नावच घेतात. संपर्कातल्या एवढ्या सगळ्यांची नावं लक्षात ठेवणं हेदेखील कौतुकास्पदच आहे. त्यांचा जवळपास सगळ्यांवरच आपुलकीचा हक्क असतो. आणि सगळेच त्यांचावर हा आपुलकीचा हक्क गाजवतात, हेही विशेष.

‘बुडती हे जन देखवेना डोळा’ हे संत तुकोबारायाचं वचन. भारती यांच्या प्रत्येक कृतीतून हे अनेकांनी पाहिलंय, अनुभवलंय. ‘रंजल्या-गांजल्यां’साठी त्यांचा हात सदैव तत्परच असतो. त्यामुळे विविध संकटांत, अडचणीत असलेले अनेकजण आपली व्यथा भारती यांच्याकडे मांडतात. त्यावर भारती स्वतः सोल्यूशन काढतात किंवा दुसरीकडे कुठलं जुगाड करून देतात.

स्त्रियांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या मनात खूप तळमळ आहे. स्त्रिया सर्वागांनी परिपूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांची धडपड असते. स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांचं कार्य अविरत सुरूच राहतं. त्या ‘वनिता समाज’ या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. या पदावरून अनेक वर्षांपासून नियमित उपक्रम सुरूच आहेत. जागृती, आरोग्य, शिक्षण, कला, मनोरंजन अशा विविध विषयांवर महिलांसाठी ही संस्था काम करते.

‘स्पष्ट बोला, मोकळं व्हा’ हा भारती यांचा विशेष गुण. त्या कोणतंही कार्य रेंगाळत ठेवत नाहीत. त्यांचं संगठनकौशल्य वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्या टीममधल्या 6 ते 90 वर्षांपर्यंतच्या सगळ्याच मेंबर त्यांच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याने जुळून आहेत. त्या प्रत्येकाच्या किंवा प्रत्येकीच्या गुणाचं, टॅलेंटचं कौतुक करतात. संधी देतात. प्रोत्साहन देतात. स्वतः कलावंत असल्यामुळे कलाकार आणि कलाक्षेत्राविषयी त्या नितांत आदर बाळगतात.

जैताई नवरात्र 2017ला सेवा देताना भारती सरपटवार

अभिनय आणि गायन हा त्यांचा आवडता छंद. आता कामाचा व्याप वाढला त्यामुळे त्यांना अनेक बाबी शक्य नाहीत. तरी त्यांच्या संपर्कातल्या गाणाऱ्या लेकींना, सखींना सोबत घेऊन त्यांनी भजनमंडळ स्थापन केलं. विविध वर्तमानपत्रांतील महिलांच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आजही आहे. तसेच विविध संस्था अथवा संघटनांच्या त्या पदाधिकारी आहेत. कधीकाळी वणीतल्या ‘नाट्यप्रेमी’ या संस्थेच्या त्या मेंबर होत्या.

यवतमाळ आकाशवाणीसाठी त्यांनी एका नाटिकेचं दिग्दर्शन केलं. वनिता समाजाच्या शारदीय नवरात्रात एक नवीन नाटिका असतेच. मग त्याच्या स्क्रिप्ट जमवण्यापासून तर कास्टिंग, डायरेक्शनपर्यंत विविध कामांत भारती यांचा पुढाकार असतोच. त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याची दखल घेत पहिला ‘वणी वैभव’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. रसिक रचना थिएटरने सुरू केलेला हा पहिला पुरस्कार होता.

वनिता समाज म्हणजे भारती सरपटवार, इतकं पक्क हे समीकरण झालंय. संस्थेच्या रौप्य महोत्सवाला तत्कालीन खासदार उषा चौधरी, लेखिका सुनिता आफळे यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं. आशा खाडीलकर यांच्या गायनाची बहाददार मेजवानीदेखील यावेळी झाली. स्त्रियांमधील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी वनिता समाजाच्या माध्यातून प्रयत्न झालेत. त्यासाठी डॉ. रूपा कुळकर्णी आणि प्रा. शरद देशमुख यांचं ‘जमुरा’ हे नाट्य झालं. पूरग्रस्त आणि अनाथ बालकांसाठी शिबिरं त्यांनी घेतलीत.

जमेल तेवढं त्यातून सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके वाटल्यात. सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेअंतर्गत 50पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्त्व त्यांनी संस्थेच्या माध्यमातून स्वीकारलं. महिलांसाठी कायदेविषक मार्गदर्षन शिबिरं घेतलीत. लोकन्यायांलयातून महिलांना न्याय मिळवून दिला. कुपोषित बालके आणि गर्भवती महिलांसाठी विशेष शिबिरं घेतलीत. त्यांना मोफत औषधोपचार केलेत. महिलांसाठी कर्करोग निदान, आरोग्य आणि सर्वांसाठी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं घेतलीत.

भारती सरपटवार एक यशस्वी नेतृत्त्व आहे. कुटुंबप्रमुखासारखाच त्यांचा अनेक क्षेत्रात दरारा आहे. आदर आहे. अकृत्रिम माया आणि आपुलकीने त्या सर्वांमध्ये प्रिय आहेत. प्रत्येक जनरेशनला ती आपली सखीच वाटते. निस्वार्थ कर्म आणि त्यातून मिळणारा आनंद त्या घेतात. इतरांनादेखील घेण्यास प्रोत्साहित करतात.

त्यांचे पती माधव उपाख्य बाळासाहेब सरपटवार, मुलगा इंजि. शैलेश, सून शर्वरी, मुलगी शिल्पा, नातवंड हर्षदा आणि राम यांचाही त्यांना खूप सपोर्ट आहे. वयाच्या सत्तरीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. तरीही कामाचा भार त्यांना खाली ठेवावा वाटत नाही. यंदा कोरोनामुळे जैताई नवरात्र साधेपणाने होत आहे. दरवर्षी पती बाळासाहेब आणि त्या जैताई मंदिरात मुक्कामी राहून सेवा देतात. त्यांना निरोगी दीर्घायू लाभो, ह्या सदिच्छा.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.