सुशीलओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे अखेर बिल काढण्यात आले आहे. या कामाचे एमबी करून साडे पाच लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यात वळवण्यात आले आहे. या प्रकरणी नेत्यांनी निवेदन दिले तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र पुढे आंदोलन तर झाले नाही उलट निकृष्ट बांधकामाचे बिलही काढण्यात आले.
खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकामाचे इस्टिमेट 12 लाख 76 हजारांचे होते. या बांधकामात जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काळी चुरीचा वापर करण्यात आला. त्यामुळे बांधकाम नित्कृष्ट दर्जेचे झाले. परिणामी या भिंतीला 15 दिवसातच मोठमोठे तडे गेले. याबाबत तक्रार करण्यात आली मात्र ठेकेदाराने प्लास्टिक पेंटचा वापर करून रातोरात भिंतीवरील सर्व भेगा बुजविल्या.
सदर निकृष्ट बांधकाम पाडून त्याजागेवर नवीन चांगले बांधकाम करण्याची मागणी शिवसेनेचे दयाकर गेडाम यांनी वरिष्ठ अधिकार्यपर्यंत केली होती. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या आढावा बैठकीत पंचायत समिती सदस्य प्रणिता घुगुल यांनी सुद्धा बांधकामाची चौकशी करून बांधकामाचे बिल काढू नये अशी मागणी केली होती. तक्रारीवरून चौकशीत अधिकाऱ्यांना भिंतीला भेगा पडलेल्या दिसल्या.
सदर काम वादग्रस्त असताना तसेच याबाबत अनेक तक्रारी असताना सदर कामाचे बिल काढण्याची एवढी घाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या ग्रामपंचायतीमध्ये पैसे जमा झाले असून ती रक्कम काढण्याकरिता पंचायत समितीकडून त्वरित परवानगीसाठी खटाटोप सुरू असल्याची माहिती आहे. या कामात अभियंता व अधिकारी यांचे संगनमत झाल्याचे बोलले जात आहे.
नेत्यांचे आंदोलन विरले हवेत
परिसरातील नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी सदर कामाची वरपर्यंत तक्रार केली होती. त्यांनी सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुरावेही सादर केले. कार्यवाही न केल्यास आंदोलन व आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला होता. मात्र पुढे ना उपोषण झाले, ना आंदोलन झाले. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उत आला आहे.
हे देखील वाचा: