नागेश रायपुरे, मारेगाव: सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुका व भाजपा महिला मोर्चा मारेगाव तालुकाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. महिला अत्याचार विरोधात तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील विविध भागात, महिला माता- भगिनींवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार विरोधात निदर्शने करण्यात आली. कोवीड रूग्णालयातसुध्दा महिला अत्याचाराच्या शिकार होत असल्याने महिलांचे जीवन असुरक्षित आहे. असेही निवेदनात नमूद केले आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रशासन व सरकारवर वचक नसल्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधे सातत्याने वाढ झाली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करून ठाकरे सरकारला जाब विचारण्यात आला आहे. महिलांची सुरक्षा करता येत नसेल, तर मुख्यमंत्री यांनी खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी ही भाजपाने केली.
यावेळी येथील तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांस निवेदन देऊन महिला अत्याचारांबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी शोभा नक्षणे, शारदा पांडे, सुनीता पांढरे, रसिका दारूडे, लता दोरखंडे, शालिनी दारुडे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, विलास चिंचुलकर, अनूप महाकुलकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)