काँग्रेस प्रणीत महागठबंधन प्रत्यक्षात ‘महाठगबंधन’

महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुनगंटीवार गरजले

0

अशोक आकुलवार, (विशेष प्रतिनिधी) वणी: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाआघाडीचे महागठबंधन हे विकासाचे गठबंधन नसून ते फसवणूक करणा-यांचे ‘महाठगबंधन’ असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते आज मंगळवारी 2 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजता आयोजित वणी येथील एस बी लॉन मधील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राळेगावचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, वणीचे माजी आमदार तथा शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच भाजप, सेना व रिपाइं (आ)चे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका करताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले व पंनास वर्षांपर्यंत टिकलेले काँग्रेसचे सरकार हे विकासकामाच्या परीक्षेत सातत्याने नापास होणारे सरकार होते. मोदी सरकार हे जनसामान्यांच्या विकासाभोवती फिरणारे सरकार असल्यामुळे सातत्याने भाजपाचा झेंडा अनेक राज्यात रोवल्या जात आहे. भाजपाने कधीही निवडणुकीच्या प्रचारात जातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे जनतेने मोदी सरकारला सिंहासनावर बसवले. मोदी सरकारच्या काळात विकासाचा आलेख सातत्याने चढता राहिला असून काँग्रेसने नेहमीच गरिबी व बेरोजगारी हे प्रश्न कायम अस्तित्वात ठेवले.

यावेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर यांनी आपल्या भाषणातून युतीच्या कार्यकर्त्यांपुढे त्यांनी केलेल्या विकासाचा धावता आलेख सादर केला. याप्रसंगी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व हंसराज अहिर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांमध्ये सहकार्य केले, याचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

वाघ, सिंह आणि शोले

माजी आमदार विश्वास नांदेकर हे जेव्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले तेव्हा शिवसेनेच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘’कोण आला रे कोण आला ? शिवसेनेचा वाघ आला’’ अशा गर्जना द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मार्गदर्शनासाठी आलेल्या मुनगंटीवारांनी हाच धागा पकडून आपण राज्याचे वनमंत्री असल्याने वाघांची संख्या वाढवण्याची जबाबदारी आपणाकडेच आहे व वाघांचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी वनमंत्री म्हणून आपलीच असल्याचे ते म्हणाले. याच अनुषंगाने त्यांनी पुढे भाजप कार्यकर्त्यांना सिंहाची उपमा दिली आणि भारतमाता ही सदैव सिंहासनावरच विराजमान असते. त्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना म्हटले की राज्यात वाघांची आणि सिंहांची संख्या वाढेल. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

 

शोले चित्रपटातील विरू आणि जय या जोडीवर चित्रीत झालेल्या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे…’ या गाण्याचे स्मरण देऊन भाजप व सेना युतीत कोणतेही वाद नसून कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

उमेदवार निवडताना जातीपातीचा विचार करू नका – विश्वास नांदेकर

महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना विश्वास नांदेकरांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांची जात कोणती आहे याचा शिवसैनिकांनी कदापि विचार करू नये असा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले की दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा मेळावा विश्वास नांदेकरांच्या सूचनेवरून घेण्यात आल्यामुळे मेळाव्याला शिवसेना कार्यकत्यांची भरभरून उपस्थिती व उत्साह दिसून येत होता.

लिंकवर क्लिक करून पाहा सुधीर मुनगंटीवार यांचे धडाकेबाज भाषण…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.