जब्बार चीनी, वणी: शेतक-यांच्या तसेच दूध उत्पादकांच्या अनुदानाच्या प्रश्नांविषय़ी शनिवारी भाजपच्या वतीने टिळक चौकात आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. शनिवारी राज्यभरात दूध अनुदानाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वणीतही आंदोलन करण्यात आले. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. वणी व्यतिरिक्त रासा व चिखलगाव येथेही आंदोलन करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्व जनतेला वा-यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने कुठलीही ठोस मदत केलेली नाही. राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आलेला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीला अनुदान दिल्या गेले, मात्र महाविकास आघाडी सत्तेवर येताच त्यांनी ते बंद केले.
आता दुधाचे दर देखील खालावले आहेत. मात्र सरकारने या विषयाची दखल घेतली नाही. विविध मागण्यामध्ये गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 10 रुपये अनुदान देणे, दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देणे, दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 30 रुपये करणे, विद्युत दरवाढ कमी करणे, कोरोना काळातील वीजबिल माफ करणे, शेतक-यांना युरिया मुबलक प्रमाणात देऊन युरियाची कृत्रिम टंचाई दूर करणे, काळाबाजार करणा-या विरुद्ध कडक कारवाई करणे इ मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. लवकरच मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.
संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा), तारेंद्र बोर्डे (नगराध्यक्ष, न.प.वणी व जिल्हाअध्यक्ष, भाजयुमो यवतमाळ), दिनकरराव पावडे (महामंत्री, भाजपा यवतमाळ), विजय पिदूरकर (उपाध्यक्ष, भाजपा यवतमाळ), संजय पिंपळशेंडे (सभापती, प.स.वणी), रवी बेलूरकर (माजी शहराध्यक्ष, वणी), गजानन विधाते (तालुकाध्यक्ष, भाजपा वणी तालुका) श्रीकांत पोटदुखे (उपाध्यक्ष न.प. वणी तथा शहाराध्यक्ष, भाजपा वणी शहर), शंकर बादुरकर (उपाध्यक्ष, भाजपा वणी तालुका), कैलाश पिपरराडे , दिपक पाऊनकर (संयोजक,सो.मी वणी तालुका)व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.