बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील पोलीस स्टेशनमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात वणीतील प्रतिष्ठीत नागरिक आणि पोलीस कर्मचारी अशा एकून 127 जणांनी रक्तदान केले. पोलीस ठाण्यातील दक्षता भवनात शासनाने सोशल डिस्टन्सिंगची गाईडलाईन पाळून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील रक्तसाठा संपला आहे. प्रशासनाने आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी सरकारने रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पोलीस अधिक्षक एम राजकुमार व अप्पर पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्याा मार्गदर्शनात वणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले होते.
नागपूर येथील लाईफ लाईन रक्तपेठीची 11 जणांची टीम या शिबिरासाठी आली होती. शिबिरात 7 पोलीस अधिकारी, 40 पोलीस कर्मचारी व वणीतील 80 प्रतिष्ठीत नागरिकांनी रक्तदान केले. आधी केवळ 100 जण या शिबिरात येईल अशी अपेक्षा असताना सव्वाशे पेक्षा अधिक रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे या शिबिरात रक्तदान केले.
या शिबिरासाठी वणी येथील डॉ. अर्शद शाह, डॉ. सय्यद आतीक यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोनि इक्बाल शेख, विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, रवी इसनकर, आशिष टेकाडे, सदाशिव मेघावत व पोलीस विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.