मुकुटबनच्या तरुणांचा रक्तदान शिबिरात सहभाग
उपविभागीय पोलीस अधिकारी वणी मार्फत शिबिराचे आयोजन
सुशील ओझा, झरी: उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्फत आज मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात यात मुकुटबन आणि परिसरातील तरुणांनी रक्तदान केले. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील रक्तसाठा संपला आहे. प्रशासनाने आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी सरकारने रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात वणी येथे हे शिबिर घेण्यात आले.
वणी येथे रक्तदान शिबिर असल्याची माहिती मुकुटबन पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस विभागातर्फे याची माहिती गावातील तरुणांपर्यंत पोहोचवली. काही अवधीतच मोठ्या संख्येने रक्तदाते गोळा झाले. यात मुकुटबन येथील दत्ता अहेरवार, नामदेव जिन्नावार, सुबोध नरांजे, सुरज बोथले, नितेश पेंदोर बैलमपुर, देवेंद्र नामपेल्लीवार मांगली इ. युवकांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना मुकुटबन पोलीस स्टेशन व रक्तवीर बहुउद्देशीय संस्था मुकुटबन यांनी सहकार्य केले.
रक्तदानाची जनजागृती तसेच उपक्रम रक्तविर बहुउद्देशीय संस्था मुकुटबन द्वारे सोशल मिडीया तसेच इतर माध्यमातून सुरू राहते. रक्तवीर बहुउद्देशीय संस्था मुकुटबनचे प्रफुल भोयर, फैज शेख व प्रियल पथाडे आणि पोलीस स्टेशन मुकूटबन चे ठाणेदार सोनुने साहेब, पोलिस बांधव निरज पातुरकर, प्रदिप कवरासे, सुलभ उइके व प्रज्योत ताडुरवार यांच्या सहकार्याने युवकांनी रक्तदान केले.