पक्षातील बेईमान, गद्दारांना सोडणार नाही, बोदकुरवार यांची गर्जना

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना अश्रू अनावर...

निकेश जिलठे, वणी: निवडणुकीत विजय पराभव हे सुरुच राहतात, नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद प्रत्येक कार्यकर्त्याला मी कायमच मदत करीत आलो. मात्र मला हरवण्यासाठी पक्षातीलच काही लोकांनी गद्दारी केली, बेईमानी केली. त्याचे शल्य माझ्या मनात कायम राहील. अशा गद्दारांना लाज वाटायला पाहिजे. आता मी माझ्या स्वभावात बदल करणार व माझ्या पद्धतीने काम करणार. ही गद्दारी माझ्याशी नाही, तर पक्षाशी आहे. बेईमानांना त्यांची जागा दाखवणार, अशी गर्जना संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली. मंगळवारी मा. आ. बोदकुरवार यांच्या घरी महायुतीला राज्यात मिळालेल्या विजयाबाबत संवाद सभा होती. त्यानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांशी व पदाधिका-यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. संवाद साधताना बोदकुरवार यांना अनेकदा अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांना धीर दिला. दरम्यान त्यांचा रोख कुणाकडे होता यावर शहरात एकच चर्चा रंगत आहे.

बोदकुरवार म्हणाले की मी भाजपमध्येच राजकारणाची सुरुवात केली. 1993 पासून राजकारणात आहे. भाजपचा तालुका अध्यक्ष झालो. त्यानंतर विविध पदं भूषवलीत. पक्षाने मला एबी फॉर्म वाटण्याची जबाबदारी दिली होती. अनेक वर्ष मी अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना साथ दिली. प्रामाणिकपणे व निष्ठेने मदत करीत त्यांना निवडून आणण्यात मदत केली. त्यानंतर 2014 मध्ये युती तुटल्याने शेवटच्या क्षणी मला उमेदवारी मिळाली.

2014 मध्ये कार्यकर्त्यांनी, पदाधिका-यांनी मी केलेल्या मदतीची परतफेड करीत मला निवडून आणले. आमदार झाल्यापासून मी पूर्ण वेळ पक्ष, कार्यकर्ता व जनतेला वाहून दिला. पक्ष वाढला पाहिजे, कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, यासाठी झटत राहिलो. यात मला माझ्या कुटुंबालाही वेळ देता आला नाही. वणी विधानसभेला विकासाचे मॉडेल दाखवले. त्यामुळे 2019 मध्ये जनतेने आधीपेक्षाही अधिक मतांनी मला निवडून दिले. असे बोदकुरवार म्हणाले.

मी तिकीटासाठी कधी दिल्ली किंवा मुंबई वारी केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच फोन करून कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तयारीला लागलो. दहा वर्ष लोकांची केलेली कामे, मतदारसंघाचा केलेला कायापालट यामुळे 2019 पेक्षाही अधिक मतांनी विजय मिळेल अशी आशा होती. मात्र काही गद्दारांनी नालायक पणा केला, ही पक्षासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज माजी आमदार असलो तरी आजी आमदारांपेक्षाही अधिक काम करणार, यापुढे ही लढणार आहे. तेवढाच वेळ पक्षाला देणार, असेही ते म्हणाले.

बोदकुरवार यांचा रोख कुणाकडे ?
बोदकुरवार यांच्या प्रचारापासून दूर राहिलेल्या नेत्यांमध्ये दोन प्रमुख नावे घेतली जात आहे. हे दोन नेते हे स्वत: तिकीटाच्या शर्यतीत होते. यातील एक पदाधिकारी सुरुवातीच्या काळात बोदकुरवार यांच्या सोबत होते. मात्र नंतर ते प्रचारापासून अलिप्त राहिले. तर दुसरे माजी लोकप्रतिनिधी असलेले नेते यांनी जिल्ह्याच्या राजकारणाचे कारण देत बोदकुरवार यांच्या प्रचारातून काढता पाय घेतला. या माजी लोकप्रतिनिधीच्या मागे समाजाचा तसेच युवकांचा मोठा जनाधार आहे. या नेत्याने अलिप्त राहण्याचा बोदकुरवार यांना मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.  त्यांची जर योग्य प्रकारे मदत मिळाली असती तर बोदकुरवार यांचे नाव ‘विजया’च्या ‘बोर्डा’वर झळकू शकले असते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

लवकरच जिल्हापरिषद व नगरपालिकेची निवडणूक आहे. यात बोदकुरवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बोदकुरवार यांनी यापुढेही अधिक जोमाने काम करणार असेल जाहीर केले आहे. त्यामुळे ते येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

का झाला देरकर यांचा विजय सोप्पा…. DMK फॅक्टर ठरला वरदान…

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )

https://www.facebook.com/groups/241871233000964

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.