राजकीय स्पर्धक चुगलीखोर, तारेंद्र बोर्डे यांचे प्रत्युत्तर

बोदकुरवार विरुद्ध बोर्डे संघर्ष... हितशत्रू कान भरीत असल्याचा तारेंद्र बोर्डे यांचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणुकीचा निकाल संजीवरेड्डी बोदकुरवार यांना चांगलाच जिव्हारी लागला. त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व त्यांच्या गटाचे थेट नाव घेत पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले. त्याला तारेंद्र बोर्डे यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. बोर्डे यांनी बोदकुरवार यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले असून माझे राजकीय स्पर्धक असलेल्या हितशत्रूंनी केलेल्या चुगलीमुळे बोदकुरवार यांचा गैरसमज झाला, अशी त्यांनी आपली बाजू मांडली आहे. तसेच हे गैरसमज लवकरच दूर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी प्रेस रिलिज काढून आपली भूमिका मांडली. दरम्यान हे राजकीय स्पर्धक चुगलीखोर कोण? याची शहरात खमंग चर्चा होत आहे.

भूमिका स्पष्ट करताना तारेंद्र बोर्डे म्हणाले की जिल्हाध्यक्ष असल्याने माझ्यावर संपूर्ण जिल्ह्यातील विजयाची जबाबदारी होती. त्यामुळे आर्णी, राळेगाव, यवतमाळ या मतदारसंघाचा प्रचार तर केलाच. मात्र मी अधिकाधिक वेळ वणी विधानसभे करिता राखून ठेवला. बोदकुरवार यांनी आयोजित केलेल्या सर्व सभा, मीटिंग, पदयात्रा, जनसंपर्क, साहित्य वाटप या ठिकाणी मी उपस्थित होतो. भाषणातून उमेदवाराला जिंकण्यासाठी जाहीर आवाहन केले. माझ्या परिसरातील बूथ ते संपूर्ण वणी शहरात बोदकुरवार यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे काम न केल्याचा आरोप हा गैरसमजातून झालेला असावा.

राजकीय स्पर्धक चुगलीखोर
बोदकुरवार यांचा पराभव झाल्याने बोदकुरवार निराश झाले आहे. याचाच फायदा घेत माझे राजकीय स्पर्धक असलेल्या काही चुगलखोरांनी त्यांचे कान भरले असेल. त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल. जेव्हा ते विजयी झाले होते तेव्हा मी व माझ्या संपूर्ण कुटुंबीयांनी त्यांच्या विजयासाठी काम केले. उलट माझा मोठा भाऊ जून महिन्यांपासून आजारी आहे. मात्र बोदकुरवार यांनी एकदाही माझ्या भावाच्या प्रकृतीची विचारणा केली नाही. असाही आरोप त्यांनी बोदकुरवार यांच्यावर केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तारेंद्र बोर्डे यांनी त्यांचे राजकीय स्पर्धक चुगली करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे हे चुगलीखोर स्पर्धक कोण याची सध्या शहरात चांगलीच चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे तारेंद्र बोर्डे व त्यांच्या सहका-यांवर नक्कीच कार्यवाही होणार असा दावा बोदकुरवार यांच्या समर्थकांतर्फे केला जात आहे. लवकरच नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. त्यामुळे बोदकुरवार व बोर्डे या वादाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.