‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह गावालगत शेतात आढळला

मृतकाच्या खिशातील आधार कार्डमुळे पटली ओळख

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथून 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. गावालगत असलेल्या एका शेतात बेपत्ता असलेल्या संतोष वसंतराव काळे (35) याचा मृतदेह आढळला. तो गेल्या 7 डिसेंम्बर पासून घरुन बेपत्ता होता. मृतदेहाचा चेहरा छिन्नभिन्न असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. परंतु मृतकच्या पॅंटच्या खिशात आढळले आधारकार्ड आणि हातावर गोंदलेल्या नावावरून मृतदेह संतोष काळेचा असल्याचे निष्पन्न झाले.

वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मध्ये शिपाई पदावर कार्यरत संतोष काळे बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील वसंतराव काळे यांनी 7 डिसेंम्बरला रात्री वणी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. सर्वत्र शोध घेऊनही संतोषचा काही थांगपत्ता लागला नाही. मात्र सोमवारी दुपारी 3.30 वाजता दरम्यान गावातील जनता शाळेच्या भीतीला लागून शेतात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह मिळाल्याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतकची ओळख पटविण्यासाठी संतोष काळेच्या कुटुंबीयाना पाचारण केले. मात्र मृतदेहाचा चेहरा विद्रुप असल्यामुळे घरच्या लोकांनीसुद्दा मृतदेह संतोषचा नसल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी मृतकच्या अंगावरील कपड्यांची झडती घेतली असता खिशात संतोष वसंतराव काळे या नावाचा आधार कार्ड सापडला. तसेच पंचनामा करताना मृतकच्या हातावर संतोष नाव गोदलेले दिसून आले. त्यावरून मृतदेह बेपत्ता असलेले संतोष काळेचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र संतोष काळे यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर हे स्पष्ट होईल की संतोष यांनी आत्महत्या केली किंवा त्याची हत्या करण्यात आली.

हे देखील वाचा:

निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

Comments are closed.