निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

राष्ट्रवादीला पडणार भगदाड.... काँग्रेसद्वारा आमदारकीचे तिकिट ?

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पक्ष बळकटीसाठी अनेक वर्षांपासून कार्य करत असूनही कार्यकर्त्यांकडे पक्ष सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लवकरच ते कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर संजय देरकर यांनी देखील पक्षाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा ठपका ठेवत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता तब्बल 4 ते 4.5 वर्षांनंतर डॉ. महेंद्र लोढा हे देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला परिसरात चांगलेच खिंडार पडणार आहे.

बाल मित्र व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून डॉ. महेंद्र लोढा यांनी 4 वर्षाआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांना प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. वणी विधानसभेचे तिकीट मिळणार या आशेवर डॉ. लोढा यांनी वणी विधानसभा क्षेत्रात झपाट्याने विकास कामाचा धडाका लावला. गावोगावी लोकसहभागातून त्यांनी अनेक विकास कामे केली. याशिवाय मतदारसंघात ठिकठिकाणी शाखा स्थापन केल्यात. मात्र निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली व वणी मतदारसंघाची तिकीट काँग्रेसच्या वाटेला आली.  राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले नाही, तेव्हापासून त्यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा नेतृत्त्वावर नाराजी !
पक्षाच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांकडे पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष केले आहे. अनेक धडाडीच्या कार्यकर्त्यांना कोणतेही पद दिले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहे. जिल्ह्याचे नेतृत्वाकडून सातत्याने विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष तसेच स्थानिक निवडणुकीच्या प्रक्रियेत कायम डावलून भूमिका घेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच लवकरच राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सर्व कार्यकर्ते व पदाधिका-यांसह दुस-या समविचारी पक्षाची वाट धरणार अशी भूमिका डॉ. महेंद्र लोढा यांनी घेतली आहे.

अर्जुनी येथे बोअरवेलच्या लोकार्पणप्रसंगी डॉ. महेंद्र लोढा व गावकरी

काँग्रेसद्वारा आमदारकीचे तिकिट?
काँग्रेसला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगत आहे. या दोन पक्षांमध्ये सातत्याने होणा-या कलगीतु-यामुळे ही शक्यता अधिकच बळावली आहे. वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस म्हणजे वामनराव कासावार असे समिकरण झाले आहे. त्यांनी दुस-या फळीतील कोणत्याही नेत्याला पुढे येऊ दिले नाही असा देखील त्यांच्यावर कायम आरोप होतो. दुस-या फळीतील नेत्यांचा पद्धतशीररित्या ‘गेम’ केल्यामुळेच दुस-या फळीतील अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडत दुस-या पक्षाची वाट धरली. समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची काँग्रेसला वगळून युती झाल्यास तिथे दुस-या फळीतील कोणताही मोठा नेता नाही. त्यामुळे काँग्रेस प्रवेश करून तिथून तर डॉ. महेंद्र लोढा आपले नशिब आजमावत नाही ना? अशी देखील चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत आहे.

काँग्रेसला मिळणार बळकटी !
लवकरच वणी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. डॉ. महेंद्र लोढा यांनी काँग्रेस प्रवेश घेतल्यास आगामी दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला चांगलीच बळकटी मिळू शकते.

सध्या डॉ. महेद्र लोढा यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात आहे. आता तिथे देखील ते त्याच धडाक्यात काम करून स्वत:ची वेगळी रेघ आखणार की वामनराव कासावार यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्या नेतृत्वात काम करणार हे येणा-या काळात स्पष्ट होईल. सध्या त्यांचा काँग्रेस प्रवेश कधी होणार व त्यांच्यासोबत कोणते कार्यकर्ते व पदाधिकारी पक्ष सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी नगरपालिकेची तयारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी देखील काही दिवसांपासून ऍक्टिव्ह झाली आहे. डॉ. लोढा यांनी पक्ष सोडला तर पक्ष नेतृत्वहिन होणार  त्यामुळे महिला विंगच्या कार्यकर्त्या डॉ. लोढा यांच्या सोबत काँग्रेसमध्ये जाणार की वेगळी वाट निवडून ते भाजपकडे जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.