विलास ताजने (मेंढोली)- मेंढोली जवळील बोरगाव येथील एका कॉलेज तरुणाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि.२८) शनिवारला दुपारच्या दरम्यान घडली.
वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रोशन मारोती महाकुलकर वय (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. रोशन हा शिरपूर येथील गुरुदेव उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12 वीत शिकत होता. नुकताच रोशनचा 25 जुलैला अठरावा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आज रोशन कॉलेजला न जाता शेतकामासाठी शेतात गेला होता. परंतू कॉलेज मधून काही विध्यार्थी गावाकडे आले. त्यांना पोहण्याचा मोह झाला. रोशनही शेतातील काम आटोपून घरी आला होता.
एवढयात खांदला गावाजवळील शिरपूर ते शिंदोला मार्गाच्या कडेला शेषराव कोंगरे यांच्या शेताजवळील खड्याच्या पाण्यात मित्र पोहत असल्याची कुणकुण त्याला लागली. लगेच रोशन पोहचला आणि मित्रांसोबत पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. खोल पाण्यात बुडताच तो गाळात फसला. मित्रांनी आरडाओरडा करून रोशनला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतू तो गाळात फसल्यामुळे त्याला काढणे शक्य झाले नाही.
अखेरीस चिंचोली येथील सरपंच जयेंद्र निखाडे यांना पाचारण करण्यात आले. निखाडे यांनी रोशनला पाण्याबाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. शिरपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतकावर बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रोशनच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाच्या मागे आई, वडील आणि मोठा भाऊ आहे.