अखेर अवैधरित्या सुरु असलेल्या ‘त्या’ बोगस रुग्णालयाचे शटर डाऊन !

बोटोणी येथे गाजावाजा करुन सुरु करण्यात आले होते रुग्णालय

बहुगुणी डेस्क, वणी: बोटोणी येथील वादग्रस्त रुग्णालयाने अखेर अनिश्चित काळासाठी आपले शटर डाऊन केले आहे. या बोगस रुग्णालयाबाबत स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. तसेच या रुग्णालयाची चौकशी करावी अशी देखील मागणी करण्यात आली होती. वाढता दबाव व प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने अखेर रुग्णालय प्रशासनाने शटर डाऊन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत संस्थाचालकाकडून जाहीर सूचना लावण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयात नोकरी मिळवावी यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी प्रयत्न केले होते. शेकडो उमेदवार मुलाखतीला आले होते. तर परिसरात एक रुग्णालय येणार म्हणून स्थानिकांना देखील रुग्णसेवा मिळणार अशी आशा होती. मात्र हे रुग्णालय विनापरवानगी सुरु असल्याने केवळ सुशिक्षित बेरोजगारच नाही तर स्थानिक देखील संस्थेविषयी संताप व्यक्त करीत आहे.

एक महिन्याआधी मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे ‘अटलबिहारी बाजपेयी ग्रामीण रुग्णालय’ नावाने एक रुग्णालय सुरु करण्यात येत असल्याची जाहीरात वृत्तपत्रातून देण्यात आली. एका स्थानिक एजंटद्वारा या रुग्णालयाबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला.आदिवासी बहुल गावात शासनाच्या अनुदानाने हे शासनमान्य रुग्णालय सुरु करण्यात असल्याचा दिखावा करण्यात आला. त्यामुळे कायमस्वरुपी नोकरी मिळणार या आशेने मुलाखतीच्या दिवशी शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींची येथे झुंबड उडाली. मात्र बोटोणी येथे रुग्णालय सुरु कऱण्याची कोणतीही पूर्वतयारी स्थानिकांना दिसून आली नाही. ना कोणती रुग्णवाहिका, ना कोणते वैद्यकीय उपकरण त्यामुळे अनेकांनी याबाबत शंका देखील व्यक्त केली. परिसरातील काही डॉक्टारांनी या रुग्णालयाबाबत माहिती काढली असता अशा कुठल्या रुग्णालयाला शासनाची परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे रुग्णालय सुरु होण्याच्या आधीच वादग्रस्त ठरले. 

 

स्थानिक मीडियाने केला पर्दाफाश
मुलाखतीनंतर बोटोणी येथील एका छोट्या जागेवर हे रुग्णालय सुरु करण्यात आले. सुमारे दोन आठवडे हे रुग्णालय सुरु होते. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी, स्थानिकांनी व डॉक्टरांनी या रुग्णालयाबाबत संशय व्यक्त केल्याने स्थानिक पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरला. डिजिटल मीडिया, वृत्तपत्रातून याबाबत सिरीज चालवण्यात आली. तर मनसे नेते राजू उंबरकर यांनी देखील याविरोधात आवाज उठवला. प्रकरण तालुका आरोग्य अधिका-यांकडे गेले. रुग्णालय सुरु करण्यासाठी असलेल्या आवश्यक कागदपत्रांची संस्थेने पूर्तता केली नसल्याचे समोर आले. अखेर स्थानिक पत्रकारांचा दबाव व तालुका आरोग्य अधिकारी यांनी रुग्णालयाला 28 ऑगस्ट पर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा आदेश दिला. मात्र पत्र मिळताच लगेच दुस-या दिवशी रुग्णालयाने गाशा गुंडाळला व पुढील आदेशापर्यंत रुग्णालय बंद राहणार अशी जाहीर सूचना लावली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या रुग्णालयाला 28 ऑगस्ट पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ दिला आहे. संस्थाचालक या कागदपत्रांची पूर्तता करणार व रुग्णालय पुन्हा सुरु होणार की रुग्णालयाचे शटर कायमस्वरुपी बंद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सर्व प्रकरणात परिसरात एक रुग्णालय येणार म्हणून स्थानिक आशावादी होते. मात्र हे रुग्णालय बोगस निघाल्याने केवळ सुशिक्षित बेरोजगारच नाही तर स्थानिकांचा देखील हिरमोड झाला आहे. 

Comments are closed.