विलास ताजने, मेंढोली: मारेगाव तालुक्यातील वाघदरा (बोटोनी) येथील महिला शेतकरी कमलाबाई गजानन पिदूरकर यांच्या घरी साठवून ठेवलेल्या कापसाला दि.२१ बुधवारला दुपारी अचानक आग लागली. यात अंदाजे चार क्विंटल कापूस जळाला तर बाकी सर्व कापूस ओला झाला.
सदर ठिकाणी एकूण पंधरा क्विंटल कापूस साठवून होता.अशी माहिती निकेश पिदूरकर यांनी दिली. यात सदर महिला शेतकरी कमलाबाईचे अंदाजे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेचा पंचनामा सायंकाळ पर्यंत झाला नव्हता.
आग नेमकी कशामुळे लागली हे त्यांनाही समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नसल्याचे त्यांनी सांगितले. घरच्या मंडळींनी आणि शेजारच्या लोकांनी पाणी टाकून त्वरित आग विझविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कामलाबाईकडे बारा एकर शेत असून सर्व क्षेत्रात कापूस लागवड केली होती. कमलाबाई विधवा असून तिला दोन मुले आहे. त्यामुळे आता जगावं तरी कसं हा प्रश्न तिच्यासमोर उद्भवला आहे.