मोबाईलवरून हटकल्याने मुलाची भरधाव वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या

वणी-वरोरा हायवेवर नायगाव फाट्याजवळील घटना, उडाली एकच खळबळ

बहुगुणी डेस्क, वणी: परीक्षा संपल्यानंतर मुलं अधिकाधिक वेळा घरा बाहेर असतात. अलिकडच्या काळात तर मोबाईल आल्याने मुलांचा बराच वेळ मोबाईलवर देखील जातो. सातत्याने मित्रांसोबत बाहेर राहिल्याने व सतत मोबाईलवर असल्याने पालकांनी मुलाला हटकले. यातून एका 15 वर्षीय मुलाने भरधाव वाहनासमोर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी रात्री 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास वणी वरोरा रोडवरील नायगाव फाट्याजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मयूर बंडू सोनटक्के (15) असे मृत मुलाचे नाव आहे.

तक्रारीनुसार, मयूर बंडू सोनटक्के (15) हा नायगाव (खुर्द) येथील रहिवासी होता. तो त्याच्या कुटुंबीयांसह राहायचा. त्याने नुकतीच 10 वीची परीक्षा दिली. सध्या सुट्टी असल्याने तो मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचा. रात्री तो घर लवकर परत येत नव्हता. तसेच तो सतत मोबाईलवर राहायचा. सोमवारी दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री मयूरच्या वहिनीने त्याला जास्त वेळ बाहेर राहत जाऊ नको, मोबाईल जास्त पाहू नको असे म्हणत हटकले. घरच्यांनी रागावल्याने मयूर रात्री 10 वाजताच्या सुमारास घरून बाहेर पडला व बस स्टँडच्या दिशेने निघून आला. तो वणी-वरोरा हायवेवर आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रागाच्या भरात भरधाव वाहनासमोर उडी
हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. नायगाव फाट्याजवळ मयूरने रागाच्या भरात एका भरधाव अज्ञात वाहनासमोर उडी घेतली. हा अपघात इतका भीषण होता की यात मयूरच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावरील काही लोकांना हा अपघात दिसला. गावात याची माहिती देण्यात आली. घटनास्थळावर मयूरची चप्पल बाजूला काढून ठेवलेली आढळली.

घटनेची वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मयूरचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. आधी हा अपघात असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र मयूरच्या नातेवाईकांच्या बयानानंतर मयूरने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मयूरच्या मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले या करीत आहे. या घटनेमुळे नायगावात शोककळा पसरली आहे.

Comments are closed.