जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिल पासून राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहे. या नवीन मोहिमेला ‘मिशन ब्रेक द चेन’ असे नाव देण्यात आले आहे. शासन आदेशानुसार जिल्हा आपप्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी सायंकाळी यासंबंधी आदेश काढले. मात्र शासनादेश मधील अनेक बाबी अस्पष्ट असल्यामुळे बाजारपेठेत संभ्रमचे वातावरण पाहायला मिळाले.
मंगळवारी सकाळीपासून वणी बाजारपेठ मधील सर्वप्रकारची दुकाने उघडली. परन्तु दुपारी 11 वाजता नंतर शासकीय पथकाने सराफा,कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, जनरल, स्टेशनरी, होम अप्लायन्सज, फर्निचर, स्टील, मोबाईल, गॅरेज, ऑटोमोबाईल, बिल्डिंग मटेरिअल, फुटवेअरची दुकाने बंद करणे सुरु केले. अचानक कारवाईमुळे काही ठिकाणी व्यापारी व पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. पथक येथेच गांधी चौक, खाती चौक, यवतमाळ रोडवरील अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आत बसवून दुकानांचे शटर टाकले.
अत्यावश्यक सेवेअंतर्गत किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध विक्री, बेकरी, मिठाई, धान्य दुकाने, पशु खाद्य दुकानांचा समावेश करण्यात आले. मात्र कृषी साहित्य विक्री दुकानांबाबत कुठेही उल्लेख करण्यात आले नाही. निर्बंध कालावधीत बांधकाम क्षेत्राला सूट देण्यात आली, मात्र बांधकाम साहित्य दुकाने सुरु राहील की बंद, याबाबत आदेशीत करण्यात आले नाही.
आदेशात शेती विषयक शब्दाचा वापर करण्यात आल्यामुळे कृषी साहित्य केंद्र संचालक बुचकळ्यात पडले. किराणा साहित्याच्या नावावर शेवाळकर परिसरातील रिलायन्स मार्ट दिवस भर उघडं होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात एकीकडे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याचे नमूद करण्यात आले. तर क्र. 3 मध्ये सर्व दुकाने, बाजारपेठ, मॉल्स 30 एप्रिल पर्यंत बंद राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या 5 एप्रिल रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे अधिकारी व कर्मचारीसुद्दा दिवसभर या विवंचनेत दिसले की काय चालू ठेवायचे आणि काय बंद करायचे. त्यामुळे दिवसभर गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.