मुकुटबन येथील एक कोटींच्या विकास कामांना ब्रेक !
● राजकीय हस्तक्षेपामुळे कामात खोडा, सरपंचांचा आरोप
सुशील ओझा, झरी: मुकुटबन ग्रामपंचायतील परिसरात असणा-या कंपनीचा मोठ्या प्रमाणात सीएसआर फंड मिळाला आहे. या फंडचा उपयोग गावाच्या विकासासाठी करायचा आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सुमारे एक कोटींची विकासकामे खोळंबली असा खळबळजनक आरोप मुकुटबनचे सरपंच शंकर लाकडे यांनी केला आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत तथा बाजारपेठ व लोकसंख्या असलेल्या मुकुटबन येथे आशियातील सर्वात मोठी आरसीसीपीएल सिमेंट फॅक्टरीचे काम गेल्या एक वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे. कंपनीत हजारो कामगारापासून इतर कर्मचारी काम करीत आहे. सिमेंट कंपनीमुळे हजारो हातांना काम मिळाले आहे. सिमेंट कंपनीला सीएसआर फंड मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने त्याचा सदुपयोग गावपातळीवर चांगल्या विकास कामाकरिता करण्याचे नियम आहे.
याच अनुषंगाने आरसीसीपीएल कंपनीचे युनिट हेड अभिजित दत्ता यांनी मुकुटबन ग्रामपंचायतला १३ सप्टेंबर २०१९ रोजी पत्र लिहून गावातील गावातील सामुदायिक सभागृह परिसरात सार्वजनिक संडास बांधकाम करणार तसेच संपूर्ण तलावाचे सौंदर्यकरण, गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम, गावातील अंतर्गत रस्त्याच्या बाजूला नालीचे बांधकाम, गावाच्या सीमेवर प्रवेशद्वार, गावात पिण्याच्या पाण्याकरिता ऑरो एटीएमची व्यवस्था इत्यादी सर्व कामे २० मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते.
सरपंच लाकडे यांनी गावकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी ग्रामपंचायतला रुग्णवाहिकेची मागणी केली होती. ती मागणी सुद्धा कंपनीने मान्य केली होती. याशिवाय शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार व अत्यावश्यक साहित्य देणार असल्याचेही मान्य केले होते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे गावातील दीड कोटीच्या विकास कमला खीळ बसली असा आरोप सरपंच शंकर लाकडे यांनी केला आहे.
सिमेंट कंपनीच्या पुढाकाराने गावाचा कायापालट झाला असता परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे मार्च महिन्यात होणारा विकास काम ठप्प झाले आहे. ज्यामुळे मुकुटबन ग्रामवासियांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
वणी पाटण रोडवरील बाजार पेठेतील मुख्यमार्गवारील डीवायडर व सौंदर्यी करणाचे काम सुद्धा अश्याच प्रकारच्या गलिच्छ राजकारणामुळे ठप्प पडले आहे असा आरोप सरपंच शंकर लाकडे यांनी केला आहे. गावातील गावपुढारी असो अथवा लोकप्रतिनिधी यांनी गावाच्या विकासकामात अडथळा निर्माण करून विकासकामे ठप्प पाडत असतील तर गावाचा विकास होणार तरी कसा? असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहे.