बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकांमध्ये बदनामी का करतोय अशी विचारणा करायला गेलेल्या एकाला लाकडी राफ्टरने जबर मारहाण करण्यात आली. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. चारगाव चौकी येथे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सुनील बापुराव जांभूळकर (46) हे नायगाव ता. वणी येथील रहिवासी आहे. शेती सांभाळतात व मुंगोली येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी करतात. त्यांचे आईवडील चारगाव येथे राहतात व गावालगत असलेली शेती सांभाळतात. आरोपी प्रकाश काळे हा बोरगाव येथील रहिवासी आहे. तो गाडी भाड्याने देतो. डिसेंबर महिन्यात सुनीलचे आईवडिल प्रकाशची गाडी भाड्याने करून नातेवाईकांकडे गेले होते. तिथे प्रकाशने सुनीलच्या सोय-याकडे सुनील हा आईवडिलांचा सांभाळ करीत नाही अशी बदनामी केली. प्रकाश हा नातेवाईकांना काहीही सांगून लावालावी करतो व घरी भांडणं लावायचा प्रयत्न करतोय असे सुनीलला वाटले.
सुनील याचा जाब विचारण्यासाठी प्रकाशला कॉल लावला. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर शुक्रवारी दिनांक 17 जानेवारी रोजी सुनीलचा प्रकाशला कॉल लागला. तेव्हा सुनीलने प्रकाशला काहीही सांगून बदनामी का करतो अशी विचारणा केली. तेव्हा प्रकाशने त्याला चारगाव चौकीवर बोलावले. संध्याकाळी पावने सहा वाजताच्या सुमारास सुनील हा त्याच्या दुचाकीने चारगाव चौकी येथील बारसमोर पोहचला. तिथे त्याने दुचाकीवरूनच माझी बदनामी का करतोय अशी विचारणा केली.
तेव्हा प्रकाशने जवळच असलेल्या एका टिनाखाली पडून असलेले लाकडी राफ्टर काढले. ते राफ्टर घेऊन तो दुचाकीजवळ आला. तिथे त्याने सुनीलशी वाद घालून शिविगाळ केली. त्यानंतर त्याने रागाच्या भरात राफ्टरने मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सुनीलचे डोके फुटले व त्याच्या पाठिवर व हातावर मार लागला. त्यानंतर प्रकाश हा धमकी देत तिथून निघून गेला.
मारहाणीनंतर सुनीलने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत आरोपी प्रकाश काळे रा. बोरगाव विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेत 118(1), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
ग्राहकांचा रेस्टॉरन्टमध्ये धुडघुस, रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नीला मारहाण
Comments are closed.