रावणाऐवजी पंतप्रधान मोदी यांच्या बॅनरचे दहन, 4 जणांवर गुन्हा दाखल

बोर्डा येथील घटना, दोन स्थानिक तर 2 वणी येथील रहिवासी

जितेंद्र कोठारी, वणी: दस-याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याएवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेलं बॅनर जाळणाऱ्या चौघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल कऱण्यात आला आहे. आनंदराव भिवाजी पानघाटे, संजय आनंदराव ताजने रा. बोर्डा, बालाजी काकडे व दिलीप भोयर दोघे रा. वणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपींची नावं आहेत. सदर घटना तालुक्यातील बोर्डा गावातील शिवाजी चौक येथे 24 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6.25 वाजता घडली.

बोर्डा येथील पोलीस पाटील सुरेश गनाजी दुधकवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवार 24 ऑक्टो. दसरा सणाच्या दिवशी सायंकाळी साडे 6 वाजताच्या सुमारास आरोपींनी बोर्डा येथील शिवाजी चौकावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या फ्लेक्स बॅनरवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविले. तसेच पंतप्रधान मोदी शेतकऱ्याचे विरोधी आहे. मणिपूरच्या जनतेचे विरोधी आहे. अशी घोषणाबाजी करत द्वेशभावना पसरवण्याचा प्रयत्न केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिस पाटील यांच्या तक्रारीवरून वणी पोलिस ठाण्यात आरोपी आनंदराव भिवाजी पानघाटे, संजय आनंदराव ताजने रा. बोर्डा, बालाजी काकडे व दिलीप भोयर दोघे रा. वणी विरुद्द कलम 505(2), भादंवि तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135, 36 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पो.ना.संतोष आढाव करीत आहे.

Comments are closed.