वणीत शनिवारी कँसर रोगनिदान तपासणी शिबिर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ करणार तपासणी व मार्गदर्शन

0

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये दिनांक 19 जानेवारीला शनिवारी कँसर रोग तपासणी शिबिर व मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले आहे. आहे. सर्वसामान्य लोकांना कँसरबाबत माहिती मिळावी व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टिट्यूट नागपूर व जैन सोशल ऑर्गानायझेशन वणी द्वारा या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. महेंद्र लोढा आहेत.

हे शिबिर दोन सत्रात घेण्यात येत आहे. शनिवारी सकाळी 11 ते 3 या दरम्यान वणीतील लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कँसर रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात ऑन्कोलॉजी इंस्टिट्यूटचे कँसर रोग तज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहे. सहभागी झालेल्या रुग्णांची कँसरच्या निदानासाठी आवश्यक असलेली बायोप्सी, एफएनएसी ही तपासणी मोफत केली जाणार आहे. दुसरे सत्र हे व्याख्यान व मार्गदर्शनाचे आहे. दुपारी 4 ते 6 या वेळात वणीतील एस बी लॉनमध्ये डॉ. नितीन बोमनवार आणि डॉ. नरेश जाधव हे ‘कँसर रोगापासून कसे वाचता येईल’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. सुमारे दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज समोर आले आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये तसेच कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो. कर्करोगाचे रोगनिदान लवकर होणे आवश्यक आहे. जर कँसरचे योग्य वेळी निदान झाले तर योग्य त्या उपचाराने रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. दिवसेंदिवस कँसरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वणीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यान व मार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्ष वणीतील वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. आर डी देशपांडे आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष व उद्योजक नरेंद्र नगरवाला यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कँसर या रोगावर यशस्वी मात करून इतरांना प्रेरणा देणारे प्रा. क्षितिज फुलाडी यांचा कँसरबाबत जनजागृती करण्याच्या कार्यासाठी सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम एसबी लॉनमध्ये दुपारी 4 ते 6 या कालावधीत आहे.

कार्यक्रमाविषयी माहिती देताना कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…

स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आढळले आहे. विदर्भात खर्रा गुटखा इत्यादींच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग तर महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहेत. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. कँसरचे योग्य वेळी निदान झाले तर यावर मात करता येते. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळावा व रुग्णांचा जीव वाचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. लोढा यांनी दिली. 

कोणते लक्षण असल्यास अवश्य भेट द्यावी?
स्तनात गाठी असणे, गुप्तांगांमध्ये घाव किंवा गाठी असणे, गिळताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, तोंड उघडताना त्रास होणे, नाक, पोट इत्यादी भागांमध्ये गाठी तयार होणे, तोंडाचा व हिरड्यांचा जुना अल्सर असणे, दीर्घकाळ कफ असणे, गळ्याच्या मागे व टॉन्सिलमध्ये पांढरे डाग असणे, थुंकीतून रक्त जाणे, फुफ्फुसाचा त्रास असणे, गंभीर दस्त व मलाद्वारे रक्तस्राव होणे, थॉयराईडची समस्या असणे इद्यादी लक्षणे दिसत असल्यास कँसर रोगनिदान तपासणी शिबिर व मार्गदर्शन शिबिराला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

परिसरातील डॉक्टरांसाठी विशेष कार्यशाळा
वणी मारेगाव व झरी तालुक्यातील डॉक्टरांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी मारेगाव झरी तालुका डॉक्टर असोशिएशन या कार्यशाळेचे संयोजक आहे. संध्याकाळी 8.30 वाजता ही कार्यशाळा सुरू होईल. यात अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ परिसरातील डॉक्टारांना कँसरबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला परिसरातील डॉक्टरांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या संपूर्ण शिबिराचे आयोजन जैन सोशल ऑर्गानायझेशन (JSO) वणी द्वारा करण्यात आले आहे. ही संस्था विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असते. शिक्षण व आरोग्य याविषयी अनेक उपक्रम संस्थेद्वारा आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे डॉ. महेंद्र लोढा, विनोद मुथा, जितेंद्र जांगडा, मुकेश काठेड, सुमित चंडालिया, आनंद भंडारी, विजय मुनोत, आनंद झामड, शैलेश बत्रा, बंटी चंडालिया, चारुल झाबक, अंकुश कोटेचा, नीलेश कटारिया, तुषार नगरवाला, विशाल डुंगरवाल, अमित काठेड, प्रफुल्ल खिवंसरा, गिरीश राठी, विजय भंडारी, स्वप्निल रायसोनी, निकेत गुप्ता, मनोज कोटेचा, शैलेश बानवत, रोशन कटारिया इत्यादी सदस्य परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.