प्रिन्स लॉनजवळ विचित्र अपघात, भरधाव अल्टो कारची दुचाकी, कार व अॅटोला धडक

दोघे गंभीर जखमी... घटनास्थळी गाडी ठेवून चालक फरार

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवरील प्रिन्स लॉन जवळ एक नियंत्रण सुटलेल्या अल्टो कारने दुचाकी, स्विफ्ट डिझायर कार व एका सिक्स सिटर अॅटोला जोरदार धडक दिली. आज रविवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरचे एक पुरुष व एक महिला जखमी झाली आहे तर स्विफ्ट कारचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर धडक देणा-या अल्टो कारच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अल्टो कारमध्ये चालक व आणखी 2 व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवर वणीच्या दिशेने एक भरधाव अल्टो कार (MH03 AR 4080) येत होती. दरम्यान प्रिन्स लॉन जवळून अनिल मेहता (52) हे एका व्यक्तीसह दुचाकीने वणीच्या दिशेने येत होते. त्याच वेळी भरधाव येणा-या अल्टो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने एका दुस-या कारला व एका अॅटोला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार व मागे बसलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तर स्विफ्ट कारचाचालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने अॅटोतील कुणालाही दुखापत झाली नाही.

सदर धडक इतकी भीषण होती की यात धडक देणा-या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गाडीचा काच पूर्ण फुटला असून बोनेटचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच कारच्या चालकाने कार तिथेच ठेवून घटनास्थळावरून पळ काढला. यांच्या सोबत आणखी एक दोघे जण असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळत आहे.

धडक देणारी कार व सिक्स सिटर अॅटो

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार
या अपघातात अनिल मेहता (52) व कोमल चव्हाण (30) हे दोघे जखमी झाले आहे. अनिल यांच्या दोन्ही पायाला मार लागला आहे. तर कोमल हिच्या एका पायाला मार लागला आहे. या दोघांनाही धडक दिलेल्या स्विफ्ट कारमध्ये टाकूनच उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. धडक देणारी कार ही रासा येथील असल्याची प्राथमिक माहिती असून चालकाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जखमींचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व वणी पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. कार कुणाच्या मालकाची आहे याचा व चालकाचा शोध घेणे सुरू आहे. घटनेचा तपास पोउनि झिमटे व वासुदेव नारनवरे हे करीत आहे.

हे देखील वाचा:

सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

Comments are closed.