खळबळजनक: ग्रामसेवकाला जातीवाचक शिविगाळ

ग्रामपंचायत सदस्यावर अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला जातीवाचक शिविगाळ व धमकावल्या प्रकरणी एका ग्रामपंचायत सदस्यावर अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत मोहोर्ली येथे ही घटना घडली. कवडू देवाजी वडस्कर असे आरोपी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, संदीप तातोबा शेंडे (41) हे नांदेपेरा येथील रहिवासी असून ते पंचायत समिती वणी येथे ग्राम सेवक या पदावर नोकरी करतात. सध्या त्यांची ग्रामपंचायत रांगणा व मोहुर्ली ता वणी या गावात गावात ग्रामसेवक म्हणून नेमणूक आहे. दिनांक 7 जानेवारी रोजी ते सकाळी नेहमीप्रमाणे मोहोर्ली येथील ग्रामपंचायत कार्यालयात ड्युटीसाठी पोहोचले होते. त्यांनी ग्रामपंचायतचे लाईट बिल भरण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचारी यांचेकडे सही करून चेक दिला. यावेळी ऑफीसमध्ये मोहुर्ली गावाचे सरपंच दिपमाला वडस्कर, पाणीपुरवठा कर्मचारी निखील झाडे, योजनादुत निखील कोल्हे, व गावातील ईतर दोघे जण हजर होते.

संदीप हे कार्यालयीन कामे करीत असताना दुपारी अंदाजे 01 वाजताच्या दरम्यान मोहुर्ली गावातील ग्राम पंचायत सदस्य कवडू देवाजी वडस्कर हे ऑफिसमध्ये आले. ते त्यांच्या बाजुला खुर्चीवर बसले. कवडू यांनी ग्रामसेवकाला तू मला विचारल्या शिवाय लाईट बिल कसे भरले. तू नोकर आहे नोकरासारखा राहा असा दम दिला. त्यावर ग्रामसेवकाने सरपंचाच्या सांगण्यावरून बिल भरल्याचे कवडू यांना सांगितले. त्यावर कवडू यांनी जातीवाचक उल्लेख करीत ग्रामसेवकाचा सर्वां समोर अपमान केला.

ग्रामसेवकाच्या मते कवडू हे मासिक सभेचे प्रोसिडिंग मागत होते. त्यावर ग्रामसेवकाने रितसर अर्ज करा, तुम्हाला कॉपी देतो असे सांगितले. पण कवडू हे कपाटातील मासिक सभेचे प्रोसिडिंग जबरदस्ती घेऊन गेले. त्यानंतर कवडू यांनी ग्रामसेवकाला बरबाद करतो. पाहून घेतो अशी धमकी देऊन त्यांना शिविगाळ केली.

जातीवाचक शिवीगाळ झाल्याने ग्रामसेवक संदीप शेंडे हे वणीला आले. त्यांनी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व इतर सदस्यांना झालेली घटना सांगितली. यांनी त्यांच्या अधिका-यांशी या प्रकरणी चर्चा करून पोलीस स्टेशनला कवडू देवाजी वडस्कर यांच्या विरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी ग्रामपंचायत सदस्य कवडू देवाजी वडस्कर याच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) व बीएनएसच्या कलम 221, 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.