विलास ताजने, मेंढोली: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील रिलायन्स सिमेंट कंपनीत स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी, झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
झरी तालुक्यातील मुकुटबन येथे रिलायन्स सिमेंट कंपनीच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. मागील सहा – सात वर्षांपासून कंपनीने परिसरातील अडेगाव, मुकुटबन आदी गावातील जमिनी सिमेंट कंपनी करिता खरेदी केल्या होत्या. परंतु कंपनी स्थापन करण्याचे काहीच संकेत दिसत नव्हते. मात्र आता प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे.
झरी तालुका अत्यंत अविकसित तालुका आहे. परिणामी तालुक्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. म्हणून सदर कंपनीत कुशल, अकुशल कामाकरिता स्थानिक बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पाकरीता दिल्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवेदन सादर करतांना संभाजी ब्रिगेडचे झरी तालुका अध्यक्ष देव येवले, विजय भेदूरकर, पुरुषोत्तम आसुटकर, शंकर झाडे, संदीप आसुटकर, केतन ठाकरे, दीपक हिरादेवे, राहुल हिवरकर, प्रियल पथाडे, विवेक सोनटक्के, मंगेश झाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.