वणीत डबल विकास, चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता
नगर पालिकेचा प्रताप, शहरातील अनेक रस्त्याचे काम प्रलंबित
विवेक तोटेवार, वणी: निवडणूक तोंडावर असल्याने सध्या वणी शहरामध्ये विकासकामांना वेग आला आहे. मात्र नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोरील एक रस्ता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जुना सिमेंट रस्ता सुस्थितीत असताना हा रस्त्यावर पुन्हा रस्ता बनविण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील अनेक खराब रस्ते हे अद्यापही तयारीच्या प्रतिक्षेत आहेत. या रस्त्यासाठी लोकांकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे नुतनीकरण केले जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आलेल्या फंडचा चुराडा असल्याची प्रतिक्रिया सध्या उमटत आहे.
शहराच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा आमदार निधी मिळाला आहे. या विकासकामात शहरातील 11 रस्त्यांच्या कामासाठी नगर पालिकेने निविदा मागविल्या. या 11 रस्त्याकरिता 1 कोटी 57 लाख रुपयाचे काम निश्चित करण्यात आले. या 11 रस्त्यामध्ये वणीतील नांदेपेरा रोडवरील नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोरील रस्ता (अग्रवाल ते मल्लुरवार यांच्या घरापर्यंत) बनविण्यात येत आहे. सदर रस्ता 165 मीटर लांब व 4 मीटर रुंद आहे. हा रस्ता सुस्थितीत आहे. यावर कोणतेही खड्डे पडलेले नाही. रस्त्याची झिजही झालेली नाही.
या सुस्थितीतील रस्त्यावर 4 इंची सिमेंटची अधिकची लेअर टाकण्यात येत आहे. परंतु आधीच शहरात अनेक ठिकाणी रस्ते नसताना चांगल्या रस्त्यावर पुन्हा खर्च का केला जात आहे. हे एक न उलगडणारे कोडे आहे. शहरातील अनेक वस्तीत रस्ते नाही. रस्ते नसल्याने पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असे असताना एकाच रस्त्यासाठी पुन्हा खर्च केला जात असल्याने हा विकास सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार रस्ता – आ. बोदकुरवार
हा रस्ता 9 वर्षांपूर्वी बनविण्यात आला होता. रस्त्यावर काही ठिकाणी गिट्टी वर आली आहे. या परिसरातील नागरिकांनी रस्ता बनविण्याची मागणी केल्याने रस्ता बनविण्यात येत आहे. जुन्या रस्त्यावर 4 इंची सिमेंटची लेअर टाकण्यात येत आहे व कामाचे बिलही 4 इंची लेअरचेच निघणार आहे. इतर रस्त्यांचे काम देखील लवकरच होणार आहे.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र
Comments are closed.