सुशील ओझा, झरी: तालुक्यातील एकमेव नगरपंचायत आहे. या नगरपंचायती अंतर्गत १९ वॉर्ड आहेत. आदिवासी बहुल तालुक्यातील नगरपंचायत असल्याने विकासकामांकरिता विशेष निधीसुद्धा मिळतो. नगरपंचायती अंतर्गत १७ वॉर्डातील सिमेंट रस्ते बनविण्याकरिता वैशिष्ठपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटीची निधी मिळाला. त्या अनुषंगाने सदर सिमेंट कामाचा संपूर्ण निधी शासकीय बांधकाम विभाकडे जमा झाला.
झरी येथील १७ वॉर्डमध्ये सिमेंट रोडची कामे एक वर्षांपूर्वी करण्यात आलीत. १७ ही वॉर्डातील बहुतांश रोडची दुर्दशा झाली. अनेक रोड उखडलेत. मोठमोठे भेगा पडल्यात. बहुतांश सिमेंट रोडच्या कामात सळाखी वापरण्यात आल्या नाहीत. रोडची सायडिंगसुद्धा भरण्यात आल्या नाहीत. सिमेंट रोड खचले
शासकीय बांधकाम विभागाच्या संशयास्पद कार्यामुळे झरी येथील सर्व सिमेंट रोडच्या कामात मोठा भ्रष्टाचार होऊन लाखो रुपये हडप केल्याचा आरोप तसेच तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी केली होती. तक्रार केल्याची माहिती सदर ठेकेदार यांना मिळताच, त्यांनी वॉर्ड क्रमांक १३ मधील भेगा पडून फाटलेल्या रोडवर रस्त्याचा बाजूच्या शेतातील काळी माती खोदून भेगा बुजविल्यात व सायडिंग भरल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे संपूर्ण रोड चिखलमय झाले आहेत. पाच कोटीच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी व गुणवत्ता तपासणी केल्याशिवाय बिल काढू नये अशी मागणी लेंडे यांनी केली आहे.