वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन
दोन तास वाहतूक विस्कळीत, आंदोलकांना घेतले ताब्यात
जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वणीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात व शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारद्वारा केली जाणारी मुस्कदाबी याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात शहरातील दिग्गज नेते, विविध पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी आंदोलन समर्थक सहभागी झाले होते. सुमारे दोन तास हे आंदोलन चालले. चक्काजाममुळे घुग्गुस मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक, बस व इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान 100 ते 125 कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतले होते. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
दुपारी 12 वाजता या रेल्वे क्रॉसिंगजवळील घुग्गुस रोडवरील टोलनाक्याजवळ या आंदोलनाल सुरूवात झाली. आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात तसेच शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या इत्यादी घोषणाबाजी केली. टोलनाक्याच्या आधी चंद्रपूर-घुग्गुस व कोरपना मार्गे येणा-या गाड्या अडवून धरल्या. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत होऊन या मार्गावर दूरवर वाहनांची रांग लागली होती.
दरम्यान विश्वास नांदेकर, देवराव बोबडे, शंकरराव दानव, देविदास काळे, प्रमोद वासेकर, सुभाष वैद्य, अजय धोबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास 100 ते 125 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थानबद्ध आले. काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली.
या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना व विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे तसेच केंद्र सरकारने आंदोलकांची केलेली मुस्कटदाबी बंद करावी मागणी आंदोलकांची आहे.
हे देखील वाचा: