विवेक तोटेवार, वणी: तुम्ही आयुष्यात डॉक्टर, इंजिनियर, नेते कुणीही बना मात्र सर्वात महत्त्वाचं तुम्ही एक चांगले मनुष्य बना असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले. चंद्रपुर येथील चांदा पब्लिक स्कुल येथे नुकताच पार पडलेल्या एडु फेस्ट 2018-19 या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमात चंद्रपुर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष तसेच शाळेचे प्राचार्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शऩ करताना डॉ. लोढा यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करत मुलांसमोर त्यांचे बालपण आणि त्यांचा खडतड प्रवास उलगडून दाखवला. शाळेत असताना केवळ 45 टक्के मार्क्स मिळाल्याने झालेला अपमान आणि त्या अपमानाचा डाग पुसून काढण्यासाठी केलेले परिश्रम आणि पुढे 45 टक्के ते त्याच्या दुप्पट म्हणजे 90 टक्के कसे पडले याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. मुलं देखील डॉ. लोढा यांच्या क्लासमध्ये चांगलेच रंगले.
चंद्रपुर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कोणताही प्रसंग आला तरी त्याला न डगमगता सामोरे गेले पाहिजे. त्यामुळे यश तुमच्या पायाशी राहिल. यावेळी सामाजिक कार्याबाबत डॉ. लोढा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे मनोगत शाळेच्या अध्यक्षा सौ. जिवतोडे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या प्राचार्या यांनी केले. तर विद्यार्थ्याने उपस्थितांचे आभार मानले.