सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे

सा.बां. विभागाचा भोंगळ कारभार, थातूरमातूर डागडुजी केल्याने प्रवासी संतप्त

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांची व ऑटोची वाहतूक होते. या मार्गावर दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात नित्याचीच बाब होती. त्यामुळे भाजयुमोच्या वैभव कवरासे यांनी निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याची डागडुजी केली. मात्र हे काम थातूरमातूर केल्याने अवघ्या 15 दिवसातच पावसामुळे सदर रस्त्यावरील खड्यातील मुरुम आणि माती वाहून गेली व रस्ता जैसे थे झाला. त्यामुळे सर्वसामान्यांसह या मार्गाने वाहतूक करणारे कर्मचारीही संतप्त झाले आहे. या प्रकरणी वैभव कवरासे काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष आहे.

वणी ते कोरपना या रस्यावर चारगाव चौकी ते आबई फाटा, आबई फाटा ते ढाकोरी (बो) दरम्यान 100 फुटाच्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी 2 ते अडीच फुटाचे मोठ मोठे खड्डे पडले होते. मुख्यत: या परिसरातील नागरिकांना वणी, चंद्रपूर, कोरपना इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. शिवाय शिरपूर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, वणीची बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. मात्र इथे असलेल्या खड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागायचा.

भाजयुमोचे वैभव कवरासे यांनी निवेदन दिले. ‘वणी बहुगुणी’नेही ही समस्या उचलून धरली. प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याची डागडुजी सुरू केली. खड्डे लाल माती व मुरुमने भरण्यात आले. मात्र रस्त्याची डागडुजी करताना व खड्डे भरताना ज्या पद्धतीचा वापर करावा लागतो तसे करण्यात आले नाही. खड्यात लाल माती व मुरुम टाकून थातूरमातूर काम करण्यात आले. विशेष म्हणजे केवळ चारगाव चौकी ते आबई फाटा या रस्त्याची डागडुजी केली गेलीच नाही, तर आबई फाटा ते ढाकोरी (बो) या रस्त्यावरील खड्डे लाल माती आणि मुरुम टाकून भरण्यात आले. दरवेळी डांबर टाकून खड्डे बुजवले जाते. मात्र रहदारीचा रस्ता असतानाही असे का करण्यात आले? हे कळायला मार्ग नाही. पावसाळा सुरू असल्याने यातील माती व मुरुम वाहून गेला व त्यामुळे रस्ता जैसे थे झाला.

रिमझिम पाऊस जरी आला तरी ढाकोरी जवळ रस्त्यावर अतिशय घसरण तयार होते. त्यामुळे वाहने घसरण्याची भीत असते. चारगाव चौकी ते शिरपूर मार्गावर निर्गुडा नदीवर पुल आहे. या पुलावरही खड्डे पडले आहे. हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात वरदळ असते. बाजार, आरोग्य सुविधा, पोलीस स्टेशन यासाठी सर्वसामान्यांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. याशिवाय शिक्षक, चाकरमाने यांचीही मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वरदळ असते. सध्या पावसाचे दिवस असल्याने त्या खड्यात पाणी गेलेले आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे.

निर्गुुडा नदीवरील पुलावरही जीवघेणे खड्डे आहे.

थातुरमातूर पद्धतीने रस्त्याची डागडुजी: प्रवासी कर्मचारी
माझी शाळेवर नोकरी असल्याने मला रोज वणीहून या मार्गाने दुचाकीने येजा करावी लागते. माझ्यासारखे शेकडो प्रवासी कर्मचारी रोज दुचाकीने या रस्त्याचा वापर करतात. पावसाळा असल्याने या रत्यावरून प्रवास करण्यास भीती वाटते. पावसामुळे खड्डे बुजले आहे. त्यामुळे खड्डे दिसत नाही शिवाय अनेक ठिकाणी चिखल झाल्याने घसरण तयार झाली आहे. जर प्रशासनाला अर्धवट आणि थातूरमातूर काम करायचे होते तर कामाचा देखावा करायलाच नको होता.
– प्रवासी कर्मचारी

या प्रकरणी भाजयुमोचे वैभव कवरासे यांनी निवेदन दिले होते. रस्त्याचे खड्डे न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आता रस्त्याची परिस्थिती जैसे थे झाल्याने प्रशासन यावर काय कार्यवाही करते शिवाय वैभव कवरासे काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष आहे.

पाहा या रस्त्याची कशी दुरवस्था झाली आहे….

हे देखील वाचा:

मानवतेला काळीमा ! शौचास गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

पिवरडोल येथे तरुणावर हल्ला करणारा नरभक्षक वाघ जेरबंद

Leave A Reply

Your email address will not be published.