मोमिनपुरा हाणामारी प्रकरणात 14 जणांवर गुन्हे दाखल

सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील मोमिनपुरा येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे 7-8 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे 14 आरोपींवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत दोन्ही गटाद्वारे एकमेकांवर परस्पर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस सध्या इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सविस्तर वृत्त असे की वणीतील रहिवाशी असलेले जमीर खान उर्फ जम्मू तर इजहार शेख यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून तणाव आहे. गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी इजहार गटाच्या अब्दुल मजीद अब्दुल सत्तार याने जम्मूवर हल्ला केला होता. यात जम्मू याला दुखापत झाली होती. हल्ला करणारा मजीद हा इजहार गटाचा मानला जातो. बुधवारी मध्यरात्री दिनांक 28 मे रोजी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास मजीद त्याच्या घरी जात होता. मोमिनपु-यातील दर्गा चौकात यावेळी जम्मू व त्याच्या गटाचे काही लोक उभे होते. ते मजीदला मारहाण करण्यासाठी त्याच्या मागे धावले. त्याला पकडून त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण होताना पाहून मजीदचा भाऊ अब्दुल हाफिस उर्फ टापू अब्दुल सत्तार त्याच्या मदतीला धावला तर त्यालाही लाठी व काठ्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीची माहिती त्वरित इजहार शेख याला मिळाली. त्याने लगेच याची माहिती त्याच्या गटातील लोकांना दिली.

इजहारच्या गटातील सुमारे 30-40 लोक हातात लाकडी लाठ्या, काठ्या घेऊन मोमिनपु-याच्या दिशेने गेले. मोमिनपु-यातील दर्गा चौकात जम्मू गट व इजहार गटाचे लोक समोरासमोर आले. तिथे त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटातील लोकांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे जम्मू खान याचा परिसरात दबदबा असल्याने त्याच्या मदतीला मोमिनपु-यातील सर्वसामान्य लोक ही बाहेर पडले होते.

प्रातिनिधिक फोटो

दरम्यान पोलिसांना या रा़ड्याबाबत कुणीतरी माहिती दिली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता डीवायएसपी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव आपल्या ताफ्यासह त्वरित घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी लगेच परिस्थिती आटोक्यात आणत अर्ध्या तासातच सुमारे 15-20 आरोपींना अटक घेतली. तसेच जम्मू खान आणि इजहार शेख यांना सुद्धा अटक केली.

या प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर तक्रार दाखल केली आहे. इजहार गटाचा अब्दुल हाफिज उर्फ टापू अब्दुल सत्तार (35) यांच्या तक्रारीवरून आरोपी जम्मू उर्फ जमीर माहेबूब खान, बबलू अहेमद शेख, सैय्यद आरिफ उर्फ सैय्यय बाबूलाल शौकत, शहबाज चिनी शब्बीर चिनी, अक्रम खान सलीम खान, एजाज अली तायर अली, शेख मकबूल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंविच्या कलम 147,148,149, 324, 307, 427, 452, 188, 269, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर जम्मू याच्या तर्फे करण्यात आलेल्या तक्रारीत इजहार गयासुद्दीन शेख, अब्दुल हफिज अब्दुल सत्तार, राजू फरीदाजी आडकीने, मोहमद हुसेन मोहम्मद जाबीर, हैदर खां वाहिद खां, सैय्यद तोसिफ सैय्यद अब्दुल , तौसिफ हुसैन आबीद हुसैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंविच्या कलम 147,148,149, 324, 307, 188, 269, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव पोउनि गोपाल जाधव पोउनि फटिंग, पोउनी बाजड पाटील यांच्यासह डीबी पथकाचे सुनील खंडागळे, सुधीर पांडे, दीपक वांडर्सवार, पंकज उंबरकर, अमित पोयाम, सुदर्शन वनोळे, विठ्ठल बुरेवार, गजानन भांडककर, इकबाल शेख, रवी इसनकर, सचिन गाडगे, अमोल नूनेलवार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.