बुद्धिबळ स्पर्धेत वणीतील चिमुकले झळकणार 

राजूर कॉलरी येथील फोटोग्राफरने दिले प्रशिक्षण

0

वणी (रवि ढुमणे): जगाच्या पाठीवर अत्यंत बुद्धिवादी लोकांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळ या खेळात ब्रम्हपुरी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत वणीतील ११ वर्षीय चिमुकल्याने चेस रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. राजूर येथील फोटोग्राफीचा व्यवसाय करण्याऱ्या तरुणाच्या मार्गदर्शनात चिमुकल्यांनी यश मिळवले आहे. भविष्यात ग्रँड मास्टर स्पर्धेत ही मुले जाण्याची शक्यता बळावली आहे.

बुद्धिबळ स्पर्धा वणी सारख्या ठिकाणी फारच कमी प्रमाणात होते. अत्यंत चलाख व हुशार असलेल्यांना हा खेळ जमतो. या खेळात प्राविण्य प्राप्त करीत सतत वेळ मिळेल तेव्हा सराव करून खेळाचे महत्व जोपासत राजूर कॉलरी येथील फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे मारुती कोंडागुर्ले यांनी गेल्या एक वर्षांपासून मॉस्टर चेस अकॅडमी रवि नगर येथे सुरू केली आहे. तिथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे.

1 डिसेंबर ते 6 डिसेंबरला ब्रम्हपूरी येथे क्लासिक (ऑल इंडिया) बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या यात  जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक असलेल्या रामदास कांबळे यांचा मुलगा अनुज रामदास कांबळे हा चेस रेटिंग मध्ये आला आहे. तर सिद्धांत पिटलावार हा 13 वर्षा खालील वयोगटातील मुलांमध्ये द्वितीय आला आहे. हे दोन्ही विद्यार्थी वणीतील लॉयन्स कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेत आहे.  हे दोन्ही विद्यार्थी 11 वर्षाचे आहेत. प्रशिक्षक असलेले मारुती कोंडागुर्ले यांनी सुद्धा बुद्धिबळ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.

शनिवारी 4 वाजता आणि रविवारी सकाळी 9 वाजता प्रशिक्षक  मारुती हे राजूर कॉलरी येथून येऊन लहान मुलांना बुद्धिबळ खेळण्याचे धडे गिरवीत आहे. सध्या 40 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे.  शहरातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे धडे देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे मारुती यांनी खेळाची आवड जोपासत ज्ञानदान करण्याचा जणू विडाच उचलला आहे. रवि नगर भागातील अग्रेसन भवनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

ब्रम्हपुरी एज्युकेशनल सिटी च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत वणीतील चिमुकले झळकले आहेत. यातील अनुजला रोख रकमेचे सोबतच सिद्धांत पिटलावार, नयन करमवार आणि प्रशिक्षक मारुती कोंडागुर्ले यांना पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी फादर मॅथ्यू निरप्पेल होते तर बक्षीस वितरण माजी आमदार निलेश मोहोता यांचे हस्ते करण्यात आले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.