विवेक तोटेवार, वणी: हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हा प्रशासकीय व्यवस्थेचा बळी आहे. या प्रकरणात वनविभागातील आर्थिक घबाड कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणी सीआयडी चौकशी करून उपवनसंरक्षक शिवकुमार व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बुधवार 31 मार्च रोजी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र तथा बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणी यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधान सचिव, वनविभाग, राज्य महिला आयोग, पालकमंत्री अमरावती, प्रधान मुख्य वनसंरक्षक, पोलीस अधीक्षक अमरावती, राज्यमंत्री वनविभाग यांना पाठविण्यात आला.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व युवा ओबीसी तरुणी दीपाली चव्हाण यांना डिएफओ विनोद शिवकुमार वनविभागातील आर्थिक गैरव्यवहारासाठी मानसिक व शारीरिक त्रास देत होते. वनप्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने दिपाली परिसरात कार्य करीत असल्याने त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. गर्भवती असताना तब्बल तीन किलोमीटर जंगलात चालविल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला.
वनविभागातील तस्करांना लगाम घालण्यासाठी उचलेले धाडसी पाऊल वरिष्ठांना खुपले असल्याने डीएफओ विनोद शिवकुमार यांनी त्यांचा अन्ववीत छळ केला. या प्रकरणाची तक्रार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना वारंवार करण्यात आली. मात्र रेड्डी यांनी याकडे दुर्लक्ष करून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठबळ देऊन महिला अत्याचारात आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला. आत्महत्या करण्यापूर्वी दुर्दैवी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्व घटनाक्रम नमूद केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व रेड्डी यांना सेवेतून बडतर्फ करीत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील सहभागी सर्व व्यक्तींचा आरोपी म्हणून सहभाग निश्चित करावा, या प्रकरणाची शासनाने सीआयडी मार्फत चौकशी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी बांधवांतर्फे तिव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र, बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, संघर्ष वाहिनी यवतमाळ यांनी दिला आहे.
यावेळी बेलदार समाज बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदिप बोनगिरवार, नगरसेवक राकेश बुग्गेवार, संस्थेचे उपाध्यक्ष तथा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीचे प्रचारक गजानन चंदावार, संस्थेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बोनगिरवार, भगवान मोहिते, राकेश बरशेट्टीवार, सागर बरशेट्टीवार, विशाल बोरकुटवार आणि प्रवीण येलपूलवार आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा: