भास्कर राऊत, मारेगाव: खून करून आऱोपी फरार होतात… अचानक आरोपींच्या कारचा अपघात होतो… त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात येते… तिथून आरोपी फरार होतात… मात्र त्यांना फिल्मीस्टाईल क्ल्रुप्ती लढवत पोलीस ताब्यात घेतात… एखाद्या सिनेमाचा सिन शोभावा अशी ही घटना आज मारेगाव तालुक्यात घडली. यातील एका आरोपीला करंजीजवळ तर दुस-या आरोपीला घग्गुसजवळून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी मोठी भूमिका बजावली.
सविस्तर वृत्त असे की मिलिंद बोंदाळे (32), सलमान माजिद शेख (24) व गणेश नरेश जंगमवार (24) हे सर्व बल्लाशपूर येथील दादाभाई नौरोजी चौकातील रहिवाशी आहे. या तिघांमध्ये बल्लारपूर येथील स्वेअर पॉइंट या बार समोर मद्यधुंद अवस्थेत वाद झाला. वादात सलमान व गणेशने मिलिंदच्या डोक्यावर बॉटलने प्रहार केला. हा वाद सोडवण्यासाठी संघपाल कांबळे हा गेला. तरत्याला त्याला देखील या दोघांनी मारहाण केली.
याबाबत सलमान आणि गणेश विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. जखमी मिलिंद आणि संघपालवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी पहाटे अतिरक्तस्रावाने मिलिंदचा मृत्यू झाला. मिलिंदच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोपी सलमान व गणेश यांनी इंडिका (MH34 AA5113) गाडीने बल्लारपूर येथून पळ काढला.
आरोपीं भरधाव गाडीने पळून जात असताना सकाळी 7 वाजताच्या दरम्यान मारेगाव जवळील मांगरुळ जवळ आरोपीच्या गाडीच्या चालकासमोर एक दुसरे वाहन आले. यामुळे आरोपीचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. गाडीतील गावातील लोकांना अपघाताची माहिती मिळताच गाडीतील जखमींना लोकांनी गाडीबाहेर काढले व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे आरोपींवर उपचार करण्यात आला.
दरम्यान आरोपीच्या फोनवरील लोकेशनवरून आरोपी हे मारेगाव येथे असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक चेतन टेंभूर्णे यांनी तात्काळ मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांना संपर्क साधला व त्यांना सदर आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मारेगाव परिसरात असून ते आढळल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावे तसेच बल्लारपूर पथकाला मदत करावी अशी विनंती केली. बल्लारपूर पोलिसांची टीम मारेगाव येथे रवाना झाली.
तर दुसरीकडे गाडीला अपघात झाल्याने गाडी घटनास्थळीच होती. त्यामुळे आरोपींनी एका मित्राकरवी मारेगावा येथे एक स्कॉर्पिओ गाडी बोलावली. गाडी येताच आरोपी सलमान मजीद खान गाडीत बसून घुग्गुसकडे गेला. तर गणेश जंगमवार हा यवतमाळच्या दिशेने रवाना झाला. दरम्यान ठाणेदार जगदिश मंडलवार यांनी सूत्रे हलवली असता त्यांना आरोपीच्या वाहनाचा अपघात झाल्याचे कळले. ग्रामीण रुग्णालयात गेले असता तिथून आरोपी फरार झाल्याचे त्यांना कळले.
आरोपींना फिल्मीस्टाईल अटक
ग्रामीण रुग्णालयातून आरोपी पळाले होते. मात्र त्यांचे मोबाईल सुरू होते. यातील गणेश जंगमवार याचे लोकेशन हे करंजीजवळ दाखवत होते. दरम्यान पोलिसांनी जंगमवारच्या नातेवाईकाकडून आरोपींना फोन करायला लावला व आरोपीला भेटण्यासाठी बोलावले. आरोपी गणेश तयार झाला. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान करंजीजवळ ठरलेल्या ठिकाणी आरोपी आला. आरोपी दिसताच मारेगाव व बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. दुसरीकडे सलमान हा देखील स्कॉर्पिओ गाडीने घुग्गुसकडे असल्याचे लोकेशनवरून कळले. त्याला देखील हीच क्ल्रुप्ती वापरून ताब्यात घेण्यात आले.
सध्या दोन्ही आरोपी व त्यांना मदत करणारा तिसरा व्यक्ती हे तिघे ही बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. मारेगाव पोलिसांनी दाखवलेल्या समयसुचकता व तत्परतेमुळे आरोपींना अवघ्या काही तासांमध्ये अटक करण्यात यश आले.
Comments are closed.