घरासमोर दारू पिऊन केली ओकारी, दोन गटात राडा

मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात हाणामारी, 7 जणांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: सेवानगर ते घोन्सा रोडवर गुरुवारी मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात राडा झाला. यातील एक गट हा सेवानगर तर दुसरा गट हा रासा येथील आहे. दोन्ही गटाने एकमेकांना दारू पिऊन मारहाण केली. घरासमोर दारू पिऊन ओकारी केल्याने हा राडा झाला. या राड्यात काही तरुणांना मार लागल्याचेही समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी दोन्ही गटातील 7 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारी नुसार, आरोपी हे सेवानगर व रासा येथील रहिवासी आहेत. गुरुवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास सेवानगर ते घोन्सा रोडवर तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरु होती. याच वेळी रात्री वणी पोलिसांची चमू पेट्रोलिंग करीत होती. सेवानगर ते घोन्सा रोडवर दोन गटात हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले. तिथे दुचाकी बाजूला लावून तरुणांच्या दोन गटात वाद सुरु असलेला त्यांना आढळला. तसेच काही तरुणांना मार लागल्याचेही पोलीस पथकाच्या निदर्शनास आले.

घरासमोर ओकारी केल्याचे ठरले निमित्त
पोलिसांनी हाणामारी करण्याचे कारण विचारताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दारू पिऊन घरासमोर ओकारी केल्याचे कारण ताब्यात घेतलेल्या तरुणांनी दिले. तरुणांनी दारू पिल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी हाणामारी करणा-या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता सदर तरुणांनी दारु पिल्याचे समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी एका गटातील अंकुश क्रिष्णा मोगरे (25), हरशू संजय बिसमोरे (22) दोघेही राहणार सेवानगर, वणी व ओम अनिल बिजलवार (20) रा. टागोर चौक वणी तर दुस-या गटातील रजनिकांत बालाजी वल्लरवार (33), जगसाई नामदेव सुरपाम (20), अभिषेक मारोती बदकी (19), प्रज्योत कवडू सोनटक्के (22) सर्व रा. रासा यांच्यावर बीएनएसच्या कलम 194 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.