उकणी येथील मृत वाघाचे नखं व दात जप्त, चौघांना अटक

गुरुवारी रात्री वनविभागानाची कारवाई, आरोपी निघाले वेकोलि कर्मचारी

विवेक तोटेवार, वणी: उकणी येथे एक मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या वाघाचे वाघाचे नख व दात चोरीला गेले होते. या प्रकरणी वनविभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करीत 4 संशयीतांना ताब्यात घेतले. सतीश अशोक मांढरे (26), आकाश नागेश धानोरकर (27) दोघेही राहणार वणी, नागेश विठ्ठल हिरादेवे (27) व रोशन सुभाष देरकर (28) दोघेही राहणार उकणी ता. वणी असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संशयीत वेकोलिच्या निलजई खाणीत कर्मचारी असल्याची माहिती आहे. आरोपींकडून काही नखं व 4 दात जप्त करण्यात आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर दोन आरोपींना वन विभागाची कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या दोघांची जमानत झाल्याची माहिती आहे. वाघाची हत्या झाली की कुजलेला वाघ आढळल्यानंतर त्याचे नखं व दात काढण्यात आले, याशिवाय या कर्मचा-यांनी विक्रीच्या उद्देशाने दात व नखं चोरून नेले होते की कुतुहलापोटी, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. 

असा झाला शिकारीचा पर्दाफाश !
तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर मंगळवारी दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी एक मृत वाघ कुजलेल्या आढळून आला होता. सुमारे 10 दिवसांआधी वाघाचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला होता. दरम्यान तसेच मृत वाघाचे काही नखं व काही दात गायब असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे शिकारीचा संशय देखील व्यक्त केला जात होता. वन विभाग वाघाच्या नखांचा व दातांचा शोध घेत होते. यवतमाळ, पांढरकवडा व वणी येथील वनविभागाची चमू कामी लागली होती. या प्रकरणी काही वेकोलि कर्मचा-यांची चौकशी करण्यात आली होती.

सर्वप्रथम वाघ मृत झाल्याच्या एक ते दोन दिवस आधी काही वेकोलि कर्मचा-यांना याची माहिती मिळाली होती. त्यावरून ते या ठिकाणी गेले होते. अशी चर्चा परिसरात रंगली होती. दरम्यान मृत वाघ आढळताच त्याचे नखं व दात काढण्यात आले. वेकोलि कर्मचारी व परिसरातील नागरिकांची वन विभागाने चौकशी केली असता त्यांना दरम्यान नखं व दात कुणी चोरून नेले याची टिप मिळाली, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

 

काय करतात वाघनखं व दातांचे?
ब्लॅक मार्केटमध्ये वाघांच्या जवळपास सर्वच अवयवाला मोठी मागणी आहे. वाघाच्या चमड्यापासून जॅकेट, बॅग, बेल्ट तसेच फॅशनच्या वस्तू तयार करतात. तर वाघाचे नखं तसचे दातांचा वापर ज्वेलरी, फॅशन वस्तू तसेच मंत्रतंत्र करण्यासाठी केला जातो. नेपाळ, भूतान व आसामच्या सीमावर्ती भागात याचा मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केट चालतो. वाघाचे नखं व दातांना प्रत्येकी 50 हजार रुपये इतका भाव मिळतो. अशी माहिती आहे. त्यामुळे वाघाची शिकार केली जाते. संशय येऊ नये म्हणून मुख्यत: इलेक्ट्रिक शॉक देऊन वाघाची शिकार केली जाते.

यातील दोन आरोपींना वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी वेकोलिचे आणखी कोणी अडकले आहे का ? तसेच चोरी केलेल्या नखं व दातांचे काय केले जाणार होते? याचे उत्तर मिळू शकते. प्रकरणाची चौकशी विक्रांत खाडे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी ए. यू. देशमुख करीत आहे.

सबसिडीचे आमिष दाखवून ठगाने घातला 5 लाखांचा गंडा

इमर्जन्सी… भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.