मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे खराब रस्त्यांना ‘अच्छे दिन’
वणी/विवेक तोटेवार: वणीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उदघाटन सोहळा पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजे शुक्रवारी 19 तारखेला शुक्रवारी वणीत येणार आहेत. ते ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गाची सुधारणा करण्याच्या कामाला कालपासून वेग आला आहे.
इतक्या वर्षांपासून सदर रस्ता जीर्ण अवस्थेत आहे. महत्वाचे म्हणजे सत्ताधारी वर्ग याच मार्गावरून नेहमी ये जा करतात. परंतु तो दुरुस्त करण्याचा विचारही कुणास आला नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने का होईना या रस्त्याला डागडुजी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण रास्ता नव्याने बनविणे किंवा पूर्ण रस्त्याची डागडुगी केली जात नाही आहे, तर फक्त मोजकेच रस्ते किंवा ज्या रस्त्यांवर मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार आहेत तेवढ्याच रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे. यात वणीतील वरोरा रोडवरून आमदारांच्या घराकडे जाणाऱ्या 20 फूट रस्त्यांचा देखील समावेश आहे. त्या ठिकाणी फुटपाथवर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना उठविण्यात आले आहे.
यावरून दिसून येते की जनतेच्या समस्येकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. परंतु मुख्यमंत्री येणार म्हणून सुधारणा करण्यात आली आहे. कोणत्याही कार्याचा दिखावा करण्यापेक्षा जनतेचे हित कशात आहे याचा विचार सत्ताधा-यांनी करावयास हवा. मोदी सरकारचे वाक्य आहे की’ सबका साथ सबका विकास’ परंतु वणीत ‘सत्ताधाऱ्यांचा साथ व त्यांचाच विकास’ अशी परिस्थिती दिसून येत आहे.
सदर रस्त्यावर न्यायाधीशांचे तसेच उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी कमालीचे प्रदूषण आढळून येते. रस्त्यावरून जर चारचाकी वाहन गेले तरी संपून परिसर धुळीने न्हाहून निघतो. ही बाब साहजिकच सत्ताधारी वर्गाच्या लक्षात आली नसेल तर नवलच. विशेष म्हणजे आमदार रोज याच रस्त्यावरून ये जा करतात. त्यांच्या मनातही सदर रास्ता सुधारावा हा विचार आला नसेल तर कमालच म्हणावे लागेल. केव्हा नाही तर आता मुख्यमंत्राच्या आगमनाने प्रशासन उशिरा का होईना सत्ताधारी जागे तर झाले व काही सुधारणा तर होत आहे असेच म्हणावे लागेल. सर्वसामान्यांची प्रतिक्रिया तर अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी दर महिन्याला वणी दौरा केला तरच लोकप्रतिनिधींचे डोळे उघडेल व वणीचा विकास होईल.