मुख्यमंत्री वणीकरांना दिलासा देतील का?
वणी (रवि ढुमणे): विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन वणीत होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत. सोबतच या संमेलनात राज्यातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. गेल्या वर्षी वणीचा कायापालट करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतू अद्याप कायापालट दूर पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे विषारी औषधाने कित्येक शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्राण गेले आहे.
तालुक्यातील वास्तव चित्र समोर असताना कोणत्याही राज्यकर्त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना भेट दिली नाही. अथवा मदतीसाठी पाठपुरावा सुद्धा केला नाही. इतकेच नव्हे तर येथील लोकप्रतिनिधींनी सुद्धा औदार्य दाखविले नाही. सोबतच प्रदूषणाने माखलेल्या शहरात मुख्यमंत्री उदघाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आता या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी वणीकरांच्या समस्या जाणून येथील जनतेला पिण्यासाठी पाणी आणि प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री शहरात येणार म्हटल्यावर बंदोबस्त चोख हवाच. या बंदोबस्तासाठी शेकडो पोलीस बांधव सुरक्षेसाठी शहरात दाखल झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा असल्याने सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. इतकेच नव्हे खड्यात रस्ते असलेल्या वणी शहराच्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तहसील कार्यालय परिसरात तर गतिरोधक बसविल्या गेले आहे. सांस्कृतिक भवनाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री वणीत येणार त्यानिमित्ताने प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली. राज्याचे मुख्यमंत्री साहित्य संमेलनात येत आहेत. परंतु याआधी त्यांनी वणीचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन नगर परिषद निवडणुकीत वणीकरांना दिले होते.
आज घडीला वणीकर जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पालिकेचे पाणी आठवड्यातून एकदा मिळत आहे. अजून उन्हाळ्याला सुरुवात व्हायची आहे. त्याआधीच येथे कोरड्या दुष्काळाची तीव्रता जाणवायला लागली आहे. साहित्य संमेलनात वणीकराची आर्त हाक कोणी मांडणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सोबतीला राज्यातील व केंद्रातील मंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. पण यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी किटकनाशकाने कित्येक शेतकरी व कष्टकऱ्यांचे बळी गेले आहे. पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार, मदत तसेच त्यांचे सांत्वन करायला कोणतेही मंत्री अथवा लोकप्रतिनिधी गेले नाही. किंवा त्यांना मदत मिळवून देण्यासाठी साधे प्रयत्न सुद्धा झाले नव्हते. बाहेरील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी भेटून पण गेले. मात्र सत्तेत असणारे पुढारी केवळ भूमीपूजनातच दंग राहिल्याचे चित्र बघायला मिळाले.
येथील शेतकरी बोंड अळीच्या प्रकोपाने पूर्णतः हवालदिल झाला आहे. शासनाने त्यांना मदत जाहीर केली खरी मात्र शेतमालाला हमी भाव द्यायला शासन मागेपुढे बघत आहे. वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्या खूप झाल्या आहेत. कित्येक शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहेत. परंतु शासनाने अद्याप कापूस सोयाबीन या सारख्या शेतमालाचे दर अत्यंत कमी दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. येथे खनिजांची खाण आहे. शासनाला करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. पण या खाणीवर कोणाचेच नियंत्रण नाही. परिणामी येथे प्रदूषणाचा भस्मासुर फोफावला आहे.
अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या वणीत विदर्भ साहित्य संमेलन होत आहे. यात अनेक विचारवंत उपस्थीत असणार आहे. विविध विषयांवर रंगणाऱ्या या संमेलनात येथील समस्यांचा कोणी पाढा वाचणार का? वणीकरांच्या समस्या निकाली निघणार का? पाण्याचा प्रश्न सुटेल का? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांतून उपस्थित केल्या जात आहे.
मंत्राच्या दौऱ्याचा खर्च व वणीची पाणी समस्या
वणी शहराला पाणी देणारी जीवनदायिनी निर्गुडा सध्या कोरडी पडली आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. साहित्य संमेलनाचे निमित्ताने वणी नगरीत येणाऱ्या मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चात पिण्याच्या पाण्यासाठी उपाय योजना होत होत्या. इतकेच नव्हे तर सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी जी युद्धपातळीवर यंत्रणा उभी केली. तशीच यंत्रणा वणीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उभी केली असती तर जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असते. पण तसे न होता केवळ देखावे आणि उदघाटने यातच राजकर्ते रममाण झाले आहे. आता या साहित्य संमेलनात मुख्यमंत्री व इतर मान्यवर कोणत्या उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचे दुपारी बारा वाजता आगमन होत असून एक तास ते कार्यक्रमात थांबणार आहेत.