कोळसा कंपनीने वळवले नैसर्गिक नाल्याचे पाणी

महिलासह संतप्त गावकऱ्यांची कंपनीवर धडक

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पांढरकवडा (ल) पार्डी गाव नं. २०४ परिसरात टॉपवर्थ ऊर्जा लिमिटेड कोळसाखान आहे. या खानचालकांनी खदाणीच्या बाजूला असलेला नैसर्गिक नाला बंद केल्याने संपूर्ण पाणी जमा होऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेती उध्दवस्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कंपनीवर धडक देवून रोष व्यक्त केला.

पांढरकवडा (ल) येथील शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला असून, संपूर्ण रस्त्यावर कमरेच्यावर पाणी जमा झाले. कोळसा कंपनीने वॉलकंपाऊंड जवळ असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी बांध टाकून अडवून त्याचा प्रवाह वळविला. यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार होते. त्यामुळे पांढरकवडा (ल) येथील शेतकऱ्यांनी नाल्याचे पाणी कोळसाखान चालकांनी बांध टाकून अडविल्याची तक्रार केली.

त्या अनुषंगाने नाल्याजवळील जागेची मोजणी करण्यात आली असता कंपनीने बांध टाकून नाल्याचे पाणी अडवलेली जागा गावातीलच शेतकरी गणेश रामकृष्ण गेडेकार यांच्या मालकीची निघाली. पावसाळा सुरू व्हायचा असल्याने काही दिवस गेडेकार यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. परंतु २५ जुलै रोजी जोरदार पाऊस आल्यामुळे नाल्यातील पाण्याचे प्रमाण वाढले. व शेतात पाणी जाणार असल्याचे पाहून गेडेकर यांनी कंपनीने टाकलेल्या बांधाला पुन्हा उंच केल्याने संपूर्ण पाणी नाल्यात जमा होऊन गावकऱ्याचा मार्ग बंद झाला. .

२६ जुलैला गावातील काही महिला शेतात जाण्याकरिता निघाले असता संपूर्ण रस्ता बंद व कंबरेच्यावर पाणी जमा झाल्याचे आढळले. शेतात जाण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याने बैलगाडी रस्त्याने टाकली असता ती पाण्यात फसली. यामुळे संतप्त होऊन पांढरकवडा येथील महिलासह ग्रामवासी थेट टॉपवर्थ कंपणीवर धडकले. संपूर्ण नाल्यातील पाणी तुमच्या खदाणीत सोडा, तुमची जागा नसताना शेतकऱ्याच्या जागेवर बांध कसा बांधला असा प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. परिस्थिती चिघळणार असल्याचे पाहून मुकूटबन पोलिसांना व तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांना पाचारण करण्यात आले. तहसीलदारांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला.

कोळसा कंपनीने गेडेकर यांच्या जागेवर बांध टाकून नाल्याच्या पाण्याचे प्रवाह वळविल्याने निष्पन्न झाले. कंपनीला लागणारी १ एकर जागा शेतकऱ्याकडून विकत घेऊन नाल्याच्या प्रश्न मिटविला. परंतु खान परिसरातील जुना प्रवाह व नवीन प्रवाह असे दोन नाले एक करून पाण्याचा प्रवाह वळविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात या नाल्याच्या पाण्यामुळे अर्धवन परिसरातील शेतकऱ्यांना त्रास होणार आहे.

पंचनाम्यामध्ये कंपनीने सदर नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळविल्याने नाल्याच्या पाण्यापासून कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, रस्त्याची दुरुस्ती देखरेख स्वत: करणार, भविष्यात सदर नाल्याच्या प्रमाणाने कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कंपनी जवाबदार राहणार व मोबदला देणार अशी हमी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.