कोळसा तस्करी: धक्कादायक…. कोळसा तस्करांची वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण
'वणी बहुगुणी' इम्पॅक्ट, व्हिजिलीयन्स विभागानं घेतला वणी बहुगुणीकडून तस्करीचा आढावा
रवि ढुमणे, वणी: शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वेकोलीच्या उकणी खाणीत कोळशाची चोरी करताना कोळसा चोरट्याला सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडले. परिणामी कोळसा चोरट्याने त्या रक्षकला मारहाण केल्याची तक्रार शिरपूर ठाण्यात देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोळसा चोरीला अभय मिळत असल्याने चोरट्यांची मजल चक्क मारहाण करण्यापर्यंत जात आहे.
उकणी कोळसा खाणीत कोळशाची चोरी करताना सुरक्षा रक्षकाने कोळसा चोरट्याला पकडले यात मारहाण सुद्धा झाली. त्यानंतर येथील अधिकाऱ्यावर सुद्धा चाल करीत सुरक्षा रक्षक, विशाल गौतम कोल्हे,सतपाल उके यांना लोखंडी रॉडने मारहाण करून शस्त्रांचा धाक दाखविला. या घटनेची माहिती कोल्हे यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात दिली मात्र पोलीस येण्याआधीच अब्दुल हाफिज उर्फ टाफू, इरफान इकबाल शेख, गणेश तुकाराम चहारे हे तिघेही पळून जाण्याचा यशस्वी झाले. या घटनेने खाणीत काम करणारे कामगार आणि अधिकारी चांगलेच धास्तावले असल्याचे दिसून आले. वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन सुरक्षा देण्याची विनंती केली. सोबतच वेकोलीत असलेल्या कामगारांनी या घटनेचा निषेध करीत काही काळ कामबंद केले होते.
वणी परिसरात कोळशाच्या खुल्या व भूमिगत खाणी आहेत. सोबतच शहरालगत असलेल्या लालपुलिया परिसरात कोळशाची मोठी बाजारपेठ आहे. याचं संधीचा फायदा घेत कोळसा तस्कर सक्रिय झाले आहेत. आधीच अनधिकृत व्यवसायात असलेले पांढरपेशी पुढारी आणि “किंग” सुद्धा या व्यवसायात उतरले आहेत. रात्रभर कोळसा खाणीतून कोळसा भरून येणाऱ्या वाहनातून ब्राह्मणी मार्गावर बस्तान बसवून येणाऱ्या वाहनातून कोळसा काढून तो कोळसा पीक अप, ट्रॅक्टर सारख्या वाहनात भरून लालपुलिया बाजारपेठेत नेताना दिसत आहे. या तस्करीला वेकोली व पोलीस प्रशासनाचे जणू अभयच असल्याचे दिसून येत आहे.
रात्रभर अनधिकृत वाहने कोळशाची वाहतूक करीत असताना गस्तावर असलेल्या पोलिसांना व सुरक्षा रक्षकांना ही चोरी दिसत नाही हे नवलच आहे. प्रत्येक ठिकाणी अर्थपूर्ण हातमिळवणी करून चोरटे वेकोलीच्या कोळशावर डल्ला मारताना दिसत आहे.
वेकोलीच्या व्हिजिलीयन्स विभागानं घेतला वणी बहुगुणीकडून तस्करीचा आढावा
वणी परिसरात कोळशाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचे वृत्त ” वणी बहुगुणी”पोर्टलच्या माध्यमातून झळकतात, वेकोलीचा व्हिजिलीयन्स विभागात खळबळ उडाली होती. लागलीच त्यांनी “वणी बहुगुणी”कडे पाठपुरावा करीत कोळसा तस्करीचा आढावा घेतला. यात कोण कोण सामील झाले आहे संबंधीचा पाठपुरावा संबंधित अधिकारी करीत आहेत.
कोळसा खाणीत जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण करणे अधिकाऱ्यांशी मुजोरी करणे असे प्रकार वाढत असताना संबंधित यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून असल्याचे दिसायला लागले आहे. सध्या रस्त्यावरून जोमात कोळसा तस्करी सुरू असतानाच कोळसा चोरट्यांचे मनोबल आणखीच वाढले.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)