कोळसा भरलेले ट्रक दोन दिवसांपासून वणी पोलीस ठाण्याच्या आवारात

घुग्गुस येथून कोळसा भरून जात होते उमरेडला, कारवाईबाबत माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

जितेंद्र कोठारी, वणी: घुग्गुस येथील गुप्ता कोलवॉशरी मधून उमरेड येथील महाजेन्को कंपनीसाठी कोळसा घेऊन जाणारे दोन ट्रक बुधवार 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीचा कोळसा असल्याच्या संशयावरून रात्री गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांनी दोन्ही ट्रक वणी ठाण्यात आणून उभे केले. मात्र घटनेच्या 36 तासानंतरही दोन्ही ट्रकवर काय कारवाई करण्यात आली ? याबाबत महिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहे. वणी पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीवरसुद्दा याबाबत कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार जीएनआर कंपनीचे ट्रक क्रमांक MH40CD 5724 आणि MH40CD 6427 चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील गुप्ता कोल वॉशरीमधून कोळसा भरून वणीमार्गे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे जाण्यासाठी निघाले. बुधवारी रात्री 11 वाजता दरम्यान दोन्ही ट्रक वरोरा मार्गावरील झाबक यांच्या पेट्रोल पंपावर डीझल भरण्यासाठी थांबले होते. दरम्यान नाईट पेट्रोलिंगवर असलेले पोउपनी शिवाजी टिपूर्णे यांनी दोन्ही ट्रकच्या चालकांना दमदाटी करुन ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणून उभे केले.

गुरुवारी सकाळी दोन्ही ट्रकचा वजनकाटा केला असता त्यात बिल्टीमध्ये नमुदप्रमाणे कोळसा असल्याचे निष्पन्न झाले. ट्रक चालकांनी वाहनाचे सर्व कागदपत्रे तसेच मालाची बिल्टीसुद्दा पोलिसांना दाखवली. मात्र एका बिल्टीवर उमरेड च्या ठिकाणी ताडालीचा पत्ता असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. तसेच घुग्गुस येथुन वणीमार्गे उमरेड हा रस्ता सोयीस्कर नसून कोळसा कुठंतरी इतरत्र जात असल्याचा संशयही पोलिसांना आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महाजेन्कोचा कोळसा खुल्या बाजारात ?
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) ला जाणार कोळसा चोरट्या मार्गाने खुल्या बाजारात विकल्या जात असल्याची चर्चा आहे. वणी येथील लालपुलिया परिसरातील काही खाजगी कोळसा व्यावसायिक या काळ्या धंद्याचे खिलाडी असल्याचे बोलले जाते. घुग्गुस येथुन ताडालीसाठी निघालेला ट्रक वणीत कस पोहचला हा संशोधनाचा विषय आहे.

Comments are closed.